टीम AM : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते राजेन्द्रकुमार यांचा आज जन्मदिन आहे. राजेन्द्रकुमार यांचा जन्म. 20 जुलै 1929 रोजी सियालकोट पाकिस्तान येथे झाला. राजेंद्रकुमार टुली उर्फ राजेंद्रकुमार यांची ‘ज्युबिलीस्टार’ म्हणून ओळख होती.
राजेंद्रकुमार यांचे कुटुंब पंजाबमधील. राजेंद्रकुमार यांचे आजोबा ब्रिटीशकालिन सैन्यात कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांचा कराची, सिंध प्रांतात कापड उद्योग होता. फाळणीनंतर ते मुंबईत आले. त्यावेळी राजेंद्रकुमार यांनी आपले नशीब हिंदी चित्रपटसृष्टीत आजमायचे ठरविले. त्यांना हिरो व्हायचे नव्हते. एच. एस. रवैल यांच्यासोबत त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. पाच वर्षे त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.
राजेंद्रकुमार यांनी 1950 साली ‘जोगन’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्या बरोबर अभिनय केला. 1957 साली ‘मदर इंडिया’ मध्ये नर्गिसचा मुलगा म्हणून काम केले. 1959 साली आलेल्या ‘गूँज उठी शहनाई’ मध्ये त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून एन्ट्री केली. तसे राजेंद्रकुमार म्हणजे म्हटले तर स्टार, म्हटला तर नट तरी पण 60 च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट सिल्वर ज्युबिली झाले. यामुळे त्यांचे नाव ‘ज्युबिली कुमार’ म्हणून पडले.
राजेंद्र कुमार यांनी ‘धूल का फूल’, ‘दिल एक मंदिर’, ‘मेरे महबूब’, ‘संगम’, आरजू’, ‘प्यार का सागर’, ‘गहरा दाग’, ‘सूरज’, ‘तलाश’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात कामे केली. त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार ‘दिल एक मंदिर’, ‘आई मिलन की बेला’ आणि ‘आरजू’ या चित्रपटासाठी मिळाले व सहअभिनेता म्हणून ‘संगम’ साठी.
राजेंद्रकुमार यांचे नाव सायरा बानो यांच्याशी जोडले गेले. सायरा आणि राजेंद्रकुमार यांनी साठाव्या दशकात ‘आई मिलन की बेला’ (1964), ‘झुक गया आसमान’ (1968), अमन (1967) हे चित्रपट केले. हे सर्व चित्रपट गाजले. त्याकाळी या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या अफवा येत होत्या.
राजेंद्रकुमार यांचे लग्न झाले होते. आता हे दोघे लग्न करणार अशा अफवा उठल्या असतानाच सायरांच्या आई नसीम बानू यांनी यात उडी घेतली. लग्न झालेल्या व्यक्तीसोबत विवाह करायचा नाही, असे सांगत सायराना दूर केले. आपला मुलगा कुमार गौरव यासाठी त्यांनी ‘लव स्टोरी’ चित्रपट बनवला, या चित्रपटाचे निर्माता – निर्देशक राजेंद्रकुमार कुमारच होते. राजेंद्रकुमार कुमार यांचे 12 जुलै 1999 रोजी निधन झाले. राजेंद्रकुमार यांना आदरांजली.
शब्दांकन : संजीव वेलणकर