टीम AM : 90 च्या दशकांतील बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता कुमार गौरव आज (11 जुलै) 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. कुमारने 1981 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘लव्ह स्टोरी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिलाच चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर कुमार गौरव रातोरात स्टार झाला होता. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या यशाची हवा अभिनेत्याच्या डोक्यात चांगलीच गेली होती. त्या काळातील कुमारने नवीन अभिनेत्रींसोबत काम करण्यासही थेट नकार दिला होता. मात्र, ज्या अभिनेत्रींसोबत त्याने स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला, त्या नंतर सुपरहिट झाल्या आणि कुमार गौरवचे करिअर मात्र फ्लॉप झाले.
‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटाने कुमार गौरवला रातोरात स्टार बनवले. कुमार गौरवला त्याच्या पहिल्याच चित्रपटातून मिळालेले स्टारडम सांभाळता आले नाही. पहिल्याच चित्रपटाला मिळालेले यश पाहून त्याने लगेच ठरवले की, आपण कोणत्याही नवीन अभिनेत्रीसोबत काम करणार नाही. दरम्यान, चित्रपट निर्माते दिनेश बन्सल यांनी त्यांच्या ‘शिरीन फरहाद’ या चित्रपटासाठी यास्मिन या नवीन मुलीला साईन केले आणि त्यानंतर ते कुमार गौरवकडे गेले. मात्र, कुमार गौरवने या चित्रपटात काम करण्यास नकार देत नवीन मुलीसोबत काम करणार नसल्याचे सांगितले.
यास्मिन आणि दिनेश बन्सल यांनी कुमार गौरवची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तरीही तो या चित्रपटासाठी राजी झाला नाही आणि हा चित्रपट तसाच रखडला. अखेर यास्मिनला माघार घ्यावी लागली. या घटनेला बघता बघता 4 वर्षे उलटून गेली होती. चार वर्षांनंतर यास्मिनला कळलं की, राज कपूर हे एक चित्रपट बनवत आहेत, ज्यासाठी त्यांना उत्तर भारतीय लूक असलेली मुलगी हवी आहे. यास्मिनने ‘राम तेरी गंगा मैली’ साठी ऑडिशन दिले आणि राज कपूर यांनी लगेचच यास्मिनची निवड केली.
‘राम तेरी गंगा मैली’ रिलीज झाला तेव्हा अभिनेत्री यास्मिन जोसेफची ‘मंदाकिनी’ झाली होती. राज कपूर यांनी यास्मिनचे नाव बदलून मंदाकिनी ठेवले होते. ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट हिट झाला आणि मंदाकिनी स्टार झाली. त्याकाळी अशी वेळ आली की, मंदाकिनी हा उगवता तारा होता आणि कुमार गौरवच्या करिअरला उतरती कळ लागली होती. नेहमी नव्या अभिनेत्रींना नकार देणाऱ्या कुमार गौरवसोबत काम करण्यास कोणतीही प्रसिद्ध अभिनेत्री तयार नव्हती. त्यानंतर कुमार गौरवने एका चित्रपटासाठी निर्मात्याला मंदाकिनीचे नाव सुचवले.
निर्मात्याने मंदाकिनीशी बोलणेही केले. पण, जेव्हा तिला कळले की, चित्रपटाचा नायक कुमार गौरव आहे, तेव्हा मंदाकिनीने काम करण्यास नकार दिला. कुमार गौरवने त्या काळातील हिट अभिनेत्री पूनम ढिल्लन, रती अग्निहोत्री, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम केले होते. तरीही नंतर त्याला फारसे यश मिळू शकले नाही.