टीम AM : खाजगी बँकेत नोकरी करत असलेल्या युवकाने 40 हजार पवित्र तुळशीच्या मन्यापासून विठ्ठलाचे ‘मोझ्याक’ चित्र तयार केले आहे. चित्र पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
सचिन युवराज रेडे असं या युवकाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातल्या देवळा (खडकी) येथील रहिवासी आणि सध्या तो अंबाजोगाई शहरात राहत आहे. तो एका खाजगी बँकेत नोकरी करत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सचिनचे आई – वडील वारकरी संप्रदायातील असल्याने सचिनवर तसे संस्कार आहेत. सचिनला 2006 पासून चित्र काढण्याची आवड आहे.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी वारीसाठी राज्यभरातून दिंड्या पंढरपूरला जात आहेत. सचिनने बँकचे काम करत जसा वेळ मिळेल तसे 40 हजार पवित्र तुळशीच्या मन्यापासून विठ्ठलाचे ‘मोझ्याक’ चित्र बनवले आहे. हे चित्र बनवण्यासाठी युवराजने परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर येथून तुळशीच्या माळा विकत आणल्या. जसा कलर लागेल त्या पद्धतीने त्याने मन्याला कलर देऊन विठ्ठलाचे ‘मोझ्याक’ चित्र तयार केले आहे. हे चित्र तयार करण्यासाठी 4 महिने कालावधी लागला आहे. या विठ्ठलाच्या ‘मोझ्याक’ चित्राची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार असल्याची माहिती ‘अंबाजोगाई मिरर’ ला सचिनने दिली आहे.