टीम AM : सध्या ‘नऊवारी साडी’ या गाण्यानं लहान – मोठ्या सगळ्यांनाच वेड लावले आहे. जळगावचा संजू राठोड या गाण्याचा कर्ताधर्ता आहे. महाराष्ट्रातील धानवड तांडा (जळगाव) येथून आलेला तरुण मुलगा बाप्पाचा निस्सीम भक्त आहे. त्याची भक्ती बाप्पापर्यंत पोहोचली आणि बाप्पाच्या गाण्याने केलेल्या करिअरची सुरुवातच इतकी सुंदर झाली की, त्याची गाणी आता संपूर्ण भारतात पोहोचली आहेत. एका छोट्याशा गावातून आलेला गायक – संगीतकार-गीतकार संजू राठोड याने संगीत कलेशी निगडीत कोणतेही शिक्षण घेतले नाही. तरी त्याने तयार केलेली गाणी इतकी लोकप्रिय झाली की, संजूच्या स्वप्नांनी, त्याच्या गाण्यांनी ‘एक छोटंसं गाव ते मोठ्ठं शहर’ असा प्रवास केला.
संजूचं नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘नऊवारी’ गाण्याने तर केवळ एका महिन्यातच मिलिअन प्रेक्षकांची मने जिंकली. संजू, गौरव राठोड, प्राजक्ता घाग, मनिष महाजन आणि ‘नऊवारी’ गाण्याच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीने तयार झालेल्या या गाण्याने 20 मिलिअनचा टप्पा पार केला आहे. तर, स्पॉटिफाय या ऑडियो प्लॅटफॉर्मवर 1 मिलिअन स्ट्रीम्स मिळाले आहेत. इंस्टाग्रामवर चार लाखांहून अधिक लोकांनी रिल्स बनवल्यामुळे हे गाणं ट्रेंड झालं आहे. ‘नऊवारी’ अगोदर ‘डिंपल’, ‘देव बाप्पा – बाप्पावाला गाणा’, ‘स्टाईल मारतंय’ या गाण्यांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. कोणतही गाणं तयार केलं की, 1 मिलिअनचा आकडा पार करायचाच, याच हेतूने संजूने गाणी तयार केली आणि त्याच्या यशाचा आलेख बघता संजूच्या कलेचं आणि जिद्दीचं चीझ झालं, असं नक्कीच म्हणता येईल.
संजूचा प्रवास अतिशय सुखद होता, असे मुळीच नाही. संजूने गाणी मनापासून तयार केली होती आणि खूप वर्षाअगोदर 1 मिलिअनदेखील मिळणं खूप मोठी गोष्ट होती. मधल्या काही काळात काही कारणास्तव गाणी तयार करण्यात खंड पडल्यामुळे संजू गाणी प्रदर्शित करु शकला नाही. पण बाप्पाच्या कृपेने, गणेशोत्सवात पुन्हा एकदा ‘देव बाप्पा – बाप्पावाला गाणा’ हिट झालं. प्रेक्षकांपासून ते प्रसिध्द कलाकारांपर्यंत, सर्वांनी या गाण्यावर रिल्स केल्यामुळे संजूला स्वत:विषयी आणि घरच्यांना संजूविषयी खूप अभिमान वाटला. या संपूर्ण प्रवासात संजूला त्याच्या भावाची अतिशय मोलाची साथ मिळाली. संजूचा भाऊ गौरव राठोड याच्या सोबतीने दोघांनी एकापेक्षा एक मराठी गाणी तयार केली.
गाणी तयार करणं हे संजूचं पॅशन आहे, त्यामुळे त्याची गाणी योग्य मार्गाने प्रेक्षकांपर्यंत पोहचावी हे देखील तितकेच महत्त्वाचे होते. संजूच्या पॅशनला, ‘बिलिव्ह आर्टिस्ट सर्व्हिसेस’ कंपनीची साथ मिळाली आणि त्याचा पुढील प्रवास त्याच्या मनाप्रमाणे सुरु झाला. संजूच्या ‘नऊवारी’ गाण्याने तर खरंच कमाल केली. एका वेगळ्या पध्दतीने गाणं तयार करु या उद्देशाने हे गाणं तयार केलं. प्रेक्षकांची डिमांड पाहता या गाण्याचं फिमेल व्हर्जन देखील आणण्याचा विचार संजू करत आहे. प्रेक्षकांकडून अजून जास्त प्रेम मिळवण्यासाठी ‘बुलेटवाली’ हे संजूचं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.