कातकरवाडीत चोरी : सोन्यासह नगदी पैशांवर चोरट्यांचा डल्ला

टीम AM : अंबाजोगाई शहरासह तालुक्‍यात चोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. शनिवारी (दि. 24) पहाटेच्या दरम्यान घरात प्रवेश करून सोन्यासह नगदी पैश्यांची चोरी केल्याची घटना कातकरवाडी ता. अंबाजोगाई येथे घडली असून पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. 

रंगनाथ ज्ञानोबा कातकडे हे कातकरवाडीत राहतात. प्राथमिक माहिती नुसार, शनिवारी पहाटेच्या दरम्यान कपाटातील अंदाजे 4 तोळे सोने आणि नगदी खिशातील 15 हजार रुपये आणि पत्नीने ठेवलेले 15 हजार असे एकूण 30 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. 

घटनेची माहिती समजताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय अशोक खरात यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आजूबाजूला बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत. दरम्यान, शहरासह तालुक्‍यात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.