स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर राज बब्बर आणि रेखा यांच्यात वाढली होती जवळीक ! 

टीम AM : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा आज (23 जून) वाढदिवस आहे. राज बब्बर यांचे नाव 80 च्या दशकातील सर्वात मोठ्या अभिनेत्यांच्या यादीत गणले जाते. त्यांचा प्रत्येक चित्रपट जवळपास सुपरहिट ठरला आहे.

राज बब्बरने केवळ बॉलिवूडमध्येच आपले स्थान निर्माण केले नाही तर, ते राजकारणातीलही एक प्रसिद्ध चेहरा आहेत. एक यशस्वी राजकारणी म्हणूनही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राज बब्बर यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक चढ – उतार आले आहेत. त्यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे.

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची प्रेमकथा देखील बॉलिवूडमध्ये बरीच गाजली. पहिले लग्न झाले असताना देखील राज बब्बर बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते. ते स्मिता पाटील यांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की, त्यांनी आपले कुटुंब आणि दोन मुले सोडून स्मिता पाटील यांच्याशी लग्न केले. पण त्यांचं हे प्रेमही फार काळ टिकलं नाही.

लग्नाच्या काही काळाने स्मिता पाटील या देखील राज बब्बर यांच्यापासून कायमच्या दुरावल्या. मुलगा प्रतीक बब्बरला जन्म दिल्यानंतर स्मिता यांचा मृत्यू झाला. एकीकडे मुलगा जन्माला आल्याचा आनंद होताच, पण दुसरीकडे प्रेम गमावल्याचं दु:ख त्यांना सहन होत नव्हतं. स्मिता यांच्या निधनानंतर राज बब्बर पूर्णपणे खचून गेले होते. त्याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात रेखाची एंट्री झाली.

स्मिता पाटील यांच्या जाण्यामुळे खचलेल्या राज बब्बर यांना रेखाने आधार दिला. एका मुलाखतीत राज बब्बर यांनी रेखासोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते. मात्र, रेखाने नेहमीच या नात्याच्या वृत्ताला नकार दिला होता. मात्र, दोघांची जवळीक इतकी वाढली होती की, बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये याची कुजबुज होऊ लागली.

रेखा आणि राज बब्बर यांच्या अफेअरच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्यावर चित्रपट निर्माते हबीब नाडियादवाला यांनी राज बब्बर यांना रेखापासून दूर राहण्यासाठी धमकी दिली. तेव्हापासून ते रेखापासून दूर झाले.

मात्र, यावर बोलताना राज बब्बर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘धमकी हा शब्द मी वापरणार नाही. पण, मला धमकावण्याची क्षमता हबीब नाडियादवालामध्ये होती. आमच्या नात्यामुळे वाद निर्माण झाले होते.’