टीम AM : डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवारी प्रवेशासाठी शेवटची मुदत होती. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक विविध कागदपत्रे मिळण्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी येत होत्या.
कागदपत्रे न मिळाल्याने प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ राज्यभरातील डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आली होती. परिणामी, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सुरू असलेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून एक लाख जागांसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर कागदपत्रांच्या छायांकित प्रती स्कॅन करून जोडाव्या लागतात. या प्रक्रियेदरम्यान, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला मिळण्यास विलंब होत असल्याचे पाहून विभागाने मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.