टीम AM : उत्तराखंडच्या पिथौरागढ येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय 2 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मुनसियारी येथील होक्रा येथे ही घटना घडली आहे. बोलेरो जीप दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झालाय.
स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बागेश्वरच्या शमा येथून सर्व भाविक होकरा मंदिरात दर्शनासाठी जात होते, त्याचवेळी हा अपघात झाला.
प्रवाशांनी भरलेली बोलेरो गाडी कोसळून 500 मीटर खोल दरीत कोसळली. यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक आणि ‘आयटीबीपी’ चे जवान घटनास्थळी पोहोचत त्यांनी मदतकार्य सुरु केले. स्थानिक नायब तहसीलदारांनी जाहीर केलेल्या अधिकृत यादीत मृतांची संख्या नऊवर पोहोचली आहे. या अपघातात किशन सिंग, धरम सिंग, कुंदन सिंग, निशा देवी, उमेश सिंग, शंकर सिंग, महेश सिंग, सुंदर सिंग, खुशाल सिंग यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे.