भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 14 जुलैपर्यंत मुदतवाढ

टीम AM : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांचे सन 2022 – 23 मधील अर्ज दि. 31 मार्च, 2023 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता या योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी दि. 14 जुलै, 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दि. रा. डिंगळे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. 

या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी – चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये, इतर महसूली विभागतील शहरात व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रूपये 51  हजार रुपये व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 43 हजार रुपये इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते, अशी माहिती डिंगळे यांनी दिली.