टीम AM : थीमपासून थेट पोस्टरपर्यंत वेस्टर्न कल्चरचे हायफाय हिंदी चित्रपट केलेल्या फिरोझ खान निर्मित आणि दिग्दर्शित ‘कुर्बानी’ चित्रपटाच्या प्रदर्शनास 44 वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट 20 जून 1980 ला प्रदर्शित झाला होता. फिरोझ खान यांनी आपल्या ‘एफके’ प्रॉडक्शन्सने चित्रपटांचे वेगळे कल्चर विकसित केले होते आणि त्यात उत्तम यश प्राप्त केले.
मध्यवर्ती कथासूत्र, साधारण स्वरूपाचे पण ॲक्शन, कार रेस, ग्लॅमर, सेक्स, गीत – संगीत व नृत्य तसेच थरारक क्लायमॅक्स, जोडीला पाश्चात्य ढंगाचे पाश्वसंगीत असा सगळा मसाला मिक्स मनोरंजनाचा धमाका म्हणजे फिरोझ खानचे महागडे चित्रपट होत.
‘कुर्बानी’ चे ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये तो बात बन जाऐ’ हे नाझिया हसन यांनी गायलेल्या आणि बिंदू यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्याने प्रचंड लोकप्रियता संपादली आणि चित्रपट पूर्व प्रसिध्दीतच एकदम हाईपवर पोहचला आणि फस्ट डे फर्स्ट शोपासूनच सुपर हिट ठरला.
मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर अप्सरा येथे खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. इटालियन चित्रपट ‘The Master Touch’ वर हा चित्रपट आधारित आहे. के. के. शुक्ला यांची पटकथा आणि कादर खानचे संवाद आणि कमल बोस यांचे छायाचित्रण यांनी सिनेमा आणखीन रंजक केला.
या चित्रपटात फिरोझ खान, झीनत अमान, विनोद खन्ना, कादर खान, अमरीश पुरी, शक्ती कपूर, टुणटुण, जगदीप, दिनेश हिंगू, मॅकमोहन, विजू खोटे आणि अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची गीते इंन्दीवर आणि फारुख कैसर यांची असून संगीत कल्याणजी – आनंदजी यांचे आहे.
हम तुम्हे चाहते हैं ऐसे, क्या देखते हो सुरत तुम्हारी, लैला ओ लैला कैसी तू लैला, तुझपे कुर्बान मेरी जान अशी सगळीच गाणी सुपर हिट आहेत. अशा पाश्चात्य ढंगाच्या हिंदी चित्रपटाचाही मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला.
शब्दांकन : दिलीप ठाकूर