टीम AM : व्हॉट्सअॅपवर आजकाल स्पॅम कॉल्सचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. यामुळे कित्येक लोक फसवणुकीलाही बळी पडत आहेत. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करून, सेक्स्टॉर्शनला बळी पाडण्याचं प्रमाणही सध्या वाढलं आहे. अशा अनोळखी नंबरवरुन येणाऱ्या कॉलमुळे होणारा त्रास आता बंद होणार आहे.
व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे. याच्या मदतीने येणारे स्पॅम किंवा अनोळखी कॉल्स तुम्हाला सायलेंट करता येणार आहेत. काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअॅपच्या केवळ बीटा व्हर्जनवर उपलब्ध होते. मात्र, आता कंपनीने आपल्या सर्व अँड्रॉईड आणि अॅपल यूजर्ससाठी हे फीचर लाँच केलं आहे.
अशी करा सेटिंग
हे फीचर सुरू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी व्हॉट्सअॅप उघडावे लागेल. यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉल्स हा ऑप्शन दिसेल. कॉल्स पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Silence Unknown Calls हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही अनोळखी कॉल बंद करू शकता.
सायलेंट अननोन कॉल्स हा पर्याय बाय डिफॉल्ट बंद असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन हा पर्याय सुरू करावा लागेल. यानंतर तुम्हाला अनोळखी नंबरवरुन येणारे सर्व कॉल्स सायलेंट राहतील. त्यामुळे तुम्हाला विनाकारण होणारा त्रास बंद होणार आहे.
अॅप करा अपडेट
हे फीचर वापरण्यासाठी तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट असायला हवं. त्यामुळे तुम्हाला जर सेटिंग्समध्ये हा पर्याय दिसत नसेल, तर तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट आहे की नाही हे तपासून घ्या. व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही हे फीचर वापरू शकाल.