अक्षय भालेराव, गिरीधारी तपघाले, हिना मेश्राम यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या : अंबाजोगाईत मोर्चा, ‘रास्ता रोको’

भिमशक्ती सामाजिक संघटना, बहुजन समाज पार्टीचा पुढाकार

टीम AM : बोंढार हवेली, जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव या युवकाची भीम जयंती साजरी केली म्हणून हत्या करण्यात आली. तसेच रेणापूर, जि. लातूर येथील मातंग समाजातील गिरीधारी तपघाले आणि मुंबई येथील शासकीय वस्तीगृहात हिना मेश्राम यांचीही जातीय मानसिकतेतून हत्या करण्यात आली, याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी आज दिनांक 15 जून गुरुवार रोजी भिमशक्ती सामाजिक संघटना आणि बहुजन समाज पार्टीने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. 

भिमशक्ती सामाजिक संघटना आणि बहुजन समाज पार्टीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत अक्षय भालेराव, गिरीधारी तपघाले आणि हिना मेश्राम यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. 

यावेळी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, अक्षय भालेराव, गिरीधारी तपघाले आणि हिना मेश्राम यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तिघांच्याही कुटुंबाला शासनाने प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, महिला कुस्तीपटूंचे शारीरिक शोषण करणाऱ्या ब्रजभूषन शरण सिंग याच्यावर कठोर कारवाई करत कडक शिक्षा देण्यात यावी. जर आमच्या मागण्या विनाविलंब मंजूर नाही करण्यात आल्या तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भिमशक्ती सामाजिक संघटना आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. 

भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या आंदोलनाचे संयोजन सचिन पौळे आणि सचिन देवकर, अमोल पौळे यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. बहुजन समाज पार्टीच्या आंदोलनात डॉ. सिध्दार्थ टाकणखार, डॉ. अनंत गायकवाड, अमोल डोंगरे, स. का. पाटेकर, प्रा. सुरवसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.