गुड न्यूज : 3 हजार 750 विद्यार्थ्यांना ‘एमबीबीएस’ च्या प्रथम वर्षाला मिळणार प्रवेश

टीम AM : वाढती रुग्णसंख्या हाताळण्यासाठी डॉक्टरांची वाढती गरज लक्षात घेत काही सकारात्मक पावले टाकण्यात महाराष्ट्राने यश मिळवले असून या वर्षी तब्बल तीन हजार 750 विद्यार्थ्यांना ‘एमबीबीएस’ प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार आहे.

राज्यात आगामी 12 महिन्यात 12 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभी करण्याचा प्रयत्न असून 11 ठिकाणच्या मंजुरीचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता 100 असेल.

राज्यात 2030 पर्यंत प्रथम वर्ष एमबीबीएसच्या तब्बल सहा हजार जागा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पदव्युत्तर जागांमध्येही लक्षणीय वाढ झाली असून आता एक हजार 710 विद्यार्थी – विद्यार्थिनींना ‘पीजी’ करता येणार आहे. 

2014 मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी केवळ 832 जागा होत्या. देशात या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्ष ‘एमबीबीएस’ च्या सुमारे एक लाख जागा तयार होत आहेत. तब्बल 71 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या तमिळनाडूत देशातल्या सर्वाधिक जवळपास सात हजार जागा आहेत.