टाळ – मृदंगाच्या गजरात अंबानगरीत संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन

700 पायी वारकऱ्यांसह पालखीत तीन अश्व : पालखीचे 54 वे वर्ष

युवा नेते संकेत मोदी यांनी दर्शन घेत केले स्वागत

टीम AM : संत गजानन महाराज यांच्या पालखीचे अंबाजोगाई शहरात टाळ – मृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात आगमन झाले. शहरातील संत भगवानबाबा चौकात संकेत राजकिशोर मोदी यांनी संत गजानन महाराज यांच्या पालखीस पुष्पहार अर्पण करून व महाराजांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळी काढून अंबानगरी सज्ज झाली होती. 

26 मे 2023 रोजी आषाढी वारीसाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथुन प्रस्थान झाले आहे. दोन दिवसांच्या परळी येथील मुक्कामानंतर पालखीचे आज दुपारी अंबाजोगाई शहरात आगमन झाले. टाळ – मृदंगाच्या तालावर शेकडो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामांच्या गजरात ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, संत गजानन महाराज की जय, गण गण गणात बोते या जयघोषाने एकापाठोपाठ सुंदर अश्या चालीवर भजन करत या वारकऱ्यांनी अंबाजोगाई शहर अक्षरशः दणाणून सोडले.

संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेताना युवा नेते संकेत मोदी..

पूर्वी या पालखी सोहळ्यामध्ये हत्ती, घोडे असा लवाजमा असायचा. परंतू, गेल्या काही वर्षांपासून फक्त अश्वच या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे. प्रस्थानाच्या मार्गावर विविध गावांमध्ये, शहरांमध्ये संत गजानन महाराज पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत आणि पूजा केली जाते. पालखीचे हे 54 वे वर्ष असून पालखीत शेगाव येथून तीन अश्व आणि 700 वारकरी सहभागी आहेत. यात काही टाळकरी तर काहींच्या हाती भगव्या पताका आहेत. हा संत गजानन महाराज पालखी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व विशिष्ट अशा चौकटीत मार्गक्रमण करणारा म्हणून ओळखला जातो. 

संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून रात्री भजन – कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 15 जून रोजी गुरुवारी सकाळी 8 वाजता संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरसाठी अंबाजोगाई शहरातून प्रस्थान होईल.