एमएचटी – सीईटी परीक्षेचा निकाल 12 जूनला : सकाळी 11 वाजता होणार जाहीर

टीम AM : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी – सीईटी परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होणार आहे.

सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेऱ्यांची सुरुवात निकाल जाहीर झाल्यानंतर होणार आहे. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे. 

राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी 9 ते 21 मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून देण्यात येणारे मान्यतेबाबत संस्था, महाविद्यालये तसेच विद्यार्थीच्या लॉगीन आयडीमध्ये कळविण्यात येणार आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना अ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2023 – 24 मधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन पालक तसेच उमेदवारांच्या समस्या व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीच्या निकालाकडे लागले आहे.