टीम AM : एकेकाळी मोठ्या पडद्यावर ‘बॉबी’ म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. ‘बॉबी’, ‘सागर’, ‘रुदाली’, आणि ‘राम लखन’ यांसारख्या बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या डिंपल कपाडिया अजूनही अभिनेत्री म्हणून सक्रिय आहेत.
डिंपल यांनी आज वयाची सासष्टी पार केली आहे. करिअरसोबतच डिंपल यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील कायम चर्चा झाली. राजेश खन्नांसोबतच त्यांचं नातं कायम वादग्रस्त राहिलं. आज डिंपल यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी.
डिंपल कपाडिया यांनी वयाच्या 16 व्या वर्षीच राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांच्या दोघांच्या नात्याची कायमच चर्चा व्हायची. जवळजवळ 10 वर्ष संसार केल्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर डिंपल यांचं नाव बॉलिवूडच्या एका अभिनेत्यासोबत जोडलं गेलं. त्याचं नाव होतं सनी देओल.
80 च्या दशकात सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळाल्या होत्या. दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले होते की त्यांच्या लग्नाच्या बातम्याही समोर येऊ लागल्या होत्या.
त्यावेळी अनेक रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की, सनी देओलने त्याचे लग्न झालेलं असूनही डिंपल कपाडियासोबत गुपचूप लग्नगाठ बांधली असल्याच्या चर्चा होत्या. या बातमीवर दोन्ही स्टार्सनी मौन बाळगणंच पसंत केलं. पण एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सनी आणि डिंपल एकमेकांच्या इतके जवळ आले होते की एका क्षणी ट्विंकल खन्ना त्याला छोटे पापा म्हणू लागली होती. त्यांच्या जवळीकतेमुळे डिंपल कपाडियाची दोन्ही मुलं सनीला वडीलच मानू लागली होती असं म्हटलं जातं.
असे म्हटले जाते की जेव्हा राजेश खन्नाची टीना मुनीमसोबत जवळीक वाढू लागली, तेव्हा डिंपललाही तिचा जोडीदार सनी देओलमध्ये सापडला आणि दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. 1982 मध्ये डिंपलने राजेश खन्ना यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे प्रेम फुलले.
मात्र, मुलांसाठी तिने राजेश खन्नांसोबतच नातं जपलं. पण त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा या दोघांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यात सनी देओल आणि डिंपल कपाडिया लंडन मध्ये एकमेकांच्या हातात हात घेऊन बसलेले दिसले होते. तेव्हा या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला होता.