टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर व परिसरात गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जलसिंचन विहिरींची प्रत्यक्ष पाहणी केली. पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष तसेच कार्यतत्पर गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी बुधवारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलसिंचन विहिरींच्या कामाची पाहणी केली. तसेच देयकांसंदर्भात लाभार्थी शेतकऱ्यांसोबत संवादही साधला. ज्या शेतकऱ्यांचे जलसिंचन विहिरींचे काम सुरू आहे, त्यांच्या देयकांसंदर्भात कसलीही अडचण निर्माण होऊ देणार नसल्याची हमी देखील दिवाणे यांनी दिली.
घाटनांदूर, उजणी आणि खापरटोन या गावांमध्ये सुरू असलेल्या जलसिंचन विहिरीच्या कामाची पाहणी गटविकास अधिकारी दिवाणे यांनी केली. एकूण 26 जलसिंचन विहिरींचे काम सुरू असून सर्वच विहिरींचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येथील सर्वच जलसिंचन विहिरींचे प्रगतीपथावर असलेले काम पाहून दिवाणे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांच्यासह पीटीओ सत्यजीत पवार, रोजगार सेवक पांडुरंग जाधव, संगणक परिचालक गणेश जाधव, धनंजय जाधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून
घाटनांदूर आणि परिसरातील जलसिंचन विहिरींच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना येत असलेल्या देयकांबाबतच्या अडचणी मुक्त चर्चेतून जाणून घेतल्या. रोजगार सेवक यांच्याशी येणाऱ्या अडचणी विषयी संवाद साधला. तसेच संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही काम प्रगतीपथावर असलेल्या जलसिंचन विहिरींची लवकरात लवकर पुढील देयके काढण्याच्या सूचना केल्या.