टीम AM : घरातील वातावरण दबावाचे नसावे. मुलांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य असावे. अनेकदा पालक स्वतःच नवनवीन व्यवसाय, क्षेत्रामुळे प्रभावित होतात आणि मुलांमध्ये धरसोड वृत्ती निर्माण होते.
तरीपण, मुलांना करिअर निवडताना एकटे सोडू नये. बऱ्याचदा या वयातील विद्यार्थी अपरिपक्व असतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या जमेच्या बाजू जाणून घेऊन स्वतःचे मूल्यमापन केल्यास योग्य दिशेने वाटचाल शक्य होईल. स्पर्धेच्या युगात आपले पाल्य स्पर्धेत टिकेल की नाही, या भीतीने पालकांकडून अपेक्षांचे ओझे लादले जाते. परिसरातील हुशार मुलांकडे पाहून आपल्याही मुलाने अभ्यासात पुढे असावे, असे वाटते. हा तुलनात्मक दृष्टिकोन आणि स्वतःला जे जमले नाही ते आपल्या मुलांनी करून दाखवावे, हा आग्रह मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो.
1] भविष्याचा विचार करून निवडा अचूक शाखा
‘घोका आणि ओका’ हेच आपल्या शिक्षण पद्धतीचे सध्याचे सूत्र असते. त्यामुळे पालकांनी आपला मुलगा दहावीपर्यंत जेवढे विषय शिकला, त्यांना आवडलेले विषय आणि अजिबात न आवडलेले विषय, अशी विभागणी करून अजिबात न आवडलेले विषय बाद करावेत. मुलांना दहावीपर्यंत विषय निवडण्याचा पर्याय नव्हता. मात्र, पुढच्या शिक्षणामध्ये न झेपणारे विषय बाद करणे शक्य असते. मला एखादा विषय झेपत नाही, हे मुलांनी पालकांना मोकळेपणाने सांगितले तरच, भावी काळातील अभ्यासक्रमांची निवड करणे सोयीचे होईल.
2] पालकांनी मुलांसोबत सुसंवाद ठेवून दिशा ठरवावी
दहावी उत्तीर्ण झाल्यावर पुढे नेमके काय करायचे, हे अनेकांना समजत नाही. अशावेळी पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादण्यापेक्षाही वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची अचूक माहिती त्यांना देऊन समोरासमोर चर्चा करावी. मुलांनी घेतलेला निर्णय मोठ्या मनाने स्वीकारण्याची तयारी पालकांनी ठेवावी. कोणते क्षेत्र निवडायचे, याचा निर्णय घेताना आई-वडील खंबीरपणे पाठीशी आहेत, हा आत्मविश्वास मुलांना मिळाला, तर तेही पालकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जिवाचे रान करतील. पालकांनी मुलांचे मित्र झाले पाहिजे.
3] विद्यार्थ्यांनी कोणती शाखा निवडावी ?
टक्केवारीचा अंदाज घेऊन मुले विज्ञान, वाणिज्य व कला शाखेला जाण्याचा निर्णय करतात. पण, या पारंपरिक ठोकताळ्यातून बाहेर पडून वकिली, हॉटेल मॅनेजमेंट, फाईन आर्ट, स्पर्धा परीक्षा, परकीय भाषा, मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) अशा विविध अभ्यासक्रमाच्या बारावीनंतर संधी आहेत. कोणता अभ्यासक्रम निवडायचा हे निश्चित केले असेल, तर बारावीपर्यंत शाखा कोणतीही असली तरी फारसा फरक पडत नाही.
4] पालकांनी मित्र म्हणून करावे मार्गदर्शन
पालकांनी मुलांना निर्णयाप्रत येण्यास मदत करावी. एखाद्याला भाषा, इतिहास, सामाजिक शास्त्रात रस असल्यास पुढे त्याला स्पर्धा परीक्षेतून करिअरची संधी आहे. एखादा करिअरचा पर्याय निवडल्यानंतर त्यामध्ये काय साध्य होईल, याचा आलेख मांडता आला पाहिजे. केवळ ऐकीव माहितीपेक्षाही अचूक माहितीवर भर दिला तर मुलांनाही निर्णय घेणे सोपे होते. शंभर टक्के निकाल लागावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या शाळा मुलांना करिअर किंवा पुढील शिक्षणाविषयी मार्गदर्शन करीत नाहीत. या मधल्या टप्प्यामध्ये पालकांनी मुलांचे मित्र झाले पाहिजे.
5] अचूक निर्णयातून घडेल मुलांचे आयुष्य
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला फार कळत नाही, हे वास्तव आहे. वेगवेगळ्या करिअर संधींविषयी त्याला आकर्षण असते, पण त्याची विस्तृत माहिती नसते. पण, त्याच्या पालकांकडेही ही माहिती नसते. अशावेळी ओळखीतील कोणी काय केले, याची माहिती घेऊन किंवा बरोबरीचे मित्र कोणत्या शाखेकडे जाणार, यावरच स्वत:च्या मुलांबाबतीत निर्णय घेतले जातात. पण, निर्णय चुकला तर त्याला जबाबदार कोण याचा विचार कोणीच करत नाही. त्यामुळे मुलांची आवड व क्षमता ओळखून त्याला शाखा निवडीचे अधिकार द्यावेत.
विद्यार्थ्यांना अनेक विषयांमधून करिअरच्या संधी
वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी म्हणतात, दहावी-बारावीनंतर बहुतेक पालकांना आपला मुलगा अभियंता किंवा डॉक्टर व्हावा, अशी अपेक्षा असते. गणित चांगला असेल तर इंजिनिअरिंग, विज्ञान (बायोलॉजी) चांगले असल्यास मेडिकल, कॉमर्स उत्तम असल्यास जीएसटीसह बॅंकिंग क्षेत्रात, समाजशास्त्र, इतिहास, भाषा उत्तम असल्यास एमपीएससी, युपीएससीमध्ये संधी आहेत. भूगोल चांगले असल्यास जिऑग्राफी सर्व्हे ऑफ इंडियामध्ये संधी आहेत. राज्यशास्त्रातूनही करिअरच्या संधी आहेत. वार्षिक फी भरण्याची ऐपत आहे म्हणून मुलांच्या इच्छेविरुद्ध कोठेही प्रवेश न घेता पालकांनी मुलांची आवड व क्षमता ओळखून शाखा निवडावी. जेणेकरून तो कोणत्याही अपेक्षांखाली न राहता आनंदाने शिकेल.