अक्षय भालेरावच्या खुन्यांना फाशीची शिक्षा द्या : जातीअंत संघर्ष समितीची मागणी

जातीअंत संघर्ष समितीचे तीव्र निदर्शने : मुख्यमंत्र्यांना निवेदन

टीम AM : बोंढार हवेली या नांदेड शहराला लागून असलेल्या खेडेगावात 1 जून 2023 रोजी अक्षय भालेराव या तरूणाचा निर्घृण खून करण्यात आला. अक्षयच्या खुन्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी प्रमुख मागणी करीत जातीअंत संघर्ष समितीने अंबाजोगाईत सोमवार, दि. 5 जून रोजी निदर्शने करून उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

नांदेड शहरालगत असलेल्या बोंढार हवेली या गावात अक्षय भालेराव या तरूणाचा निघृण खून करण्यात आला. त्याचा निषेध करीत खुन्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी जातीअंत संघर्ष समिती अंबाजोगाई यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शनाचे नेतृत्व कॉ. बब्रुवाहन पोटभरे, विनोद शिंदे यांनी केले. या प्रसंगी बेटी बचाव आंदोलनाचे धीमंत राष्ट्रपाल, विनोद शिंदे, आणि कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी आंदोलन कर्त्यांसमोर आपल्या परखड भाषणातून विद्यमान सत्ताधारी यांचा तीव्र शब्दांत निषेध करून नांदेड जिल्ह्यात झालेली घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे, असे सांगत उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात अलीकडच्या काळात दलीत, अल्पसंख्यांक व स्त्रियांवर हल्ले आणि अत्याचार वाढलेले आहेत, जातीय तिरस्कारातून अस्पृश्य लोकांवर गेल्या पाच हजार वर्षांपासून हे अमानुष अत्याचार होताना दिसतात, त्या संबंधी पुढील मागण्या केल्या आहेत. शहीद अक्षय भालेराव यांच्या आई – वडिलांना 50 लाख रूपयांची मदत करा, अक्षयचा भाऊ आकाश भालेराव यास सरकारी कायम नोकरीवर घेऊन गावातच या कुटुंबाचे पुनर्वसन करा, या गावचे सर्व प्रकारचे अनुदान, जि. प, पं. स, ग्रामपंचायत निधी 20 वर्षांसाठी बंद करा, या गावातील सर्व दलीत जनतेच्या जुलूम आणि अत्याचाराची राष्ट्रीय मानव अधिकार आणि मागासवर्गीय आयोगाकडून सहा महिन्यांत चौकशी करा, या पाषाणयुगीन गावास सामूहिक दंड करा, विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवा, धर्मांध, सांप्रदायिक आणि धनदांडग्याचे पाठीराखे सरकार केंद्रात आणि राज्यात असल्याने फार न्यायाची आशा नसताना आम्ही जनतेच्या एकजुटीच्या जोरावर शहीद अक्षय भालेराव व तमाम पिडीत समाजासाठी न्याय मिळवू याची खात्री आहे, असाच आघोरी आणि निंदनीय प्रकार राजेनगर, रेणापुर जिल्हा लातूर येथे घडलेला आहे. तीन हजार रूपयांसाठी सावकाराने मातंग समाजातील गिरीधारी तपकाल याच्या कुटूंबावर हल्ला करून गिरीधारी तपकाल याचा खून पाडला आहे. या ही प्रकरणी कठोर शिक्षेची मागणी व त्या कुटूंबाला सर्व प्रकारच्या मदतीचे आवाहन सरकारला करीत आहोत. असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

सदरील निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, विनोद शिंदे, भागवत जाधव, धीमंत राष्ट्रपाल, बापू गोमसाळे, सपनाताई नाईकवाडे, विराज धिमधिमे, राम वाघमारे, सुरेश सरवदे, दत्ता काटे, बाबा शेख, अभिषेक लोंढे, शुभम बनसोडे, सुरज लोंढे, प्रदिप वेडे, सचिन लोंढे, लखन जोगदंड, शरद बनसोडे, ज्ञानोबा गायकवाड, शामराव जाधव, सविताताई तरकसे, सय्यद आसेफ, फेरोज पठाण, शेख शकील, अक्षय जोगदंड, अविनाश कुर्‍हाडे, अशोक ढवारे आदींसह इतरांच्या सहृया आहेत. यावेळी दिपक गुंजाळ, सचिन गालफाडे, रवी रोजेकर हे उपस्थित होते.