अंबाजोगाई तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
टीम AM : मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात आज जोरदार वारे आणि गारपिटीसह पाऊस झाला. या पावसाशी संबंधित घटनांत सहा जणांचा मृत्यू झाला, तर वादळी वाऱ्यांमुळे घरं, दुकानं आणि आठवडी बाजारातल्या विक्रेत्यांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथेही भरत गणपती मुंडे (वय 60) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. त्यासोबतच एक म्हैस आणि एक शेळी दगावली आहे.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, घरावरचे पत्रे उडाले आणि काही घरांच्या भिंती ढासळल्या. पाचोड – कोळी बोडखा इथं जोरदार वादळात पत्र्याच्या टपऱ्या उडाल्या. गंगापूर, वैजापूर आणि सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी इथं शेतात काम करतांना वीज पडून कृष्णा मेटे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण होपळल्याचं वृत्त आहे. पावसामुळे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्यांचं नुकसान झालं. पाचोड आणि दौलताबादच्या आठवडी बाजारात वादळी वाऱ्यानं व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर धुळीमुळे वाहनधारकांना वाहन चालवणं कठीण झालं होतं.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. अनेक घरांवरील पत्रे, दुकानांच्या नावांचे फलक उडून गेले. जोरदार हवेमुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब उन्मळून पडले. अंबड तालुक्यातल्या रवना, परडा, मठपिंपळगाव, सुखापुरी या भागात डाळिंब आणि मोसंबी फळबागांना वादळाचा फटका बसला. तीर्थपुरी, रामनगर, रवाना पराडा, डोंगरगाव, सुखापुरी भागात हलक्या स्वरुपाचा पाऊसही झाला. जोरदार हवेमुळे रस्त्यावर उठलेल्या धुळीच्या लोटांमुळे वाहनधारकांची धांदल उडाली. दरम्यान, बहुतांश भागाचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. औंढा नागनाथ, शिरड शहापूर, जवळा बाजार, वाकोडी, कुरुंदा, वसमत, कळमनुरी, आखाडा बाळापूर, कन्हेरगावसह इतर भागातही सुमारे अर्धा तास पाऊस झाला. तर जवळा बाजार परिसरात तर गारपीट झाल्याचं वृत्त आहे.
वाशिम जिल्ह्यात आज विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. रिसोड तालुक्यातील मौजे भर जहागीर इथं अंगावर वीज पडल्यानं एकाचा मृत्यू झाला. राज्यात जळगाव, पालघर, नंदुरबार, नाशिकसह अनेक जिल्ह्यात पाऊस झाल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. खामगाव तालुक्यात गेरू माटरगाव इथं एका शेतकऱ्याच्या अंगावर झाड पडून तो जागीच ठार झाला. किशोर ज्ञानेश्वर खोडके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर आणि नांदुरा रस्ता दरम्यान अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडं पडल्याने वाहतूक काही काळ थांबली होती. विद्युत तारा तुटून पडल्याने अनेक भागात वीजपुरवठा बंद झाला होता.
नंदुरबार जिल्ह्यात धुळीच्या वादळात समोरुन येणारं वाहन न दिसल्याने बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधले आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. नवापूर तालुक्यातल्या मासलीपाडा जवळ हा अपघात झाला. जखमींना विसारवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तळोदा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वडाचं झाड एका धावत्या कारवर पडून एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. तळोदा तालुक्यात रानात चरायला गेलेल्या जवळपास 30 ते 35 बकऱ्या मुसळधार पावसामुळे दगावल्याचं वृत्त आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव, नेवासे, पाथर्डी तालुक्यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही भागात तुरळक पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी – बीड राष्ट्रीय महामार्गांवर खरवंडी इथला राष्ट्रीय महामार्गांवरील पथकर नाका कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.