एसटीच्या अधिकृत थांब्यावर 30 रुपयांत नाश्ता : नाही दिल्यास महामंडळाकडून होणार कारवाई, आदेश जारी

टीम AM : एसटी महामंडळाने आपल्या अधिकृत बस थांब्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी काही वर्षांपूर्वी अवघ्या 30 रुपयामध्ये चहा – नाश्ता देण्याची योजना जाहीर केली होती.

मात्र, काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्याने महामंडळाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अधिकृत बस थांब्यावर 30 रुपयात चहा – नाश्ता न दिल्यास हॉटले चालक आणि अधिकृत बस थांब्यावर बस न थांबवल्यास चालक – वाहकावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश एसटी महामंडळाने काढले आहेत. त्याशिवाय महामंडळाचे उत्पादन असलेले ‘नाथजल’ देखील छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

एसटी महामंडळाच्या योजनेची अंमलबजावणी होत नसल्यास, एसटीचा अधिकृत थांबा ज्या विभागाच्या अखत्यारीत येतो त्या विभाग नियंत्रकास लेखी अहवाल सादर करावा, तसेच कारवाई करण्यात हयगय आढळल्यास बस स्थानकावरील वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश देणारे परिपत्रक एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (नियोजन आणि पणन) यांनी काढले आहेत.