टीम AM : धमाकेदार, मनोरंजक ‘अमर अकबर एन्थोनी’ हा चित्रपट 27 मे 1977 रोजी प्रदर्शित झाला. सत्तरच्या दशकातील बॉक्स ऑफिसवर हमखास हाऊसफुल्ल गर्दी खेचण्यात यशस्वी ठरलेल्या निर्माता आणि दिग्दर्शक मनमोहन देसाईं यांच्या ‘अमर अकबर एन्थोनी’ या चित्रपटाने ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये खणखणीत सुवर्ण महोत्सवी यश संपादले. अर्थात पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला.
मनमोहन देसाईं यांनी या चित्रपटात आपला लाॅस्ट ॲण्ड फाऊंड हाच हुकमी फाॅर्मुला वापरला. लहानपणी हरवलेले तीन भाऊ मोठेपणी योगायोगाने आपल्या आई पित्यासह भेटतात आणि ते खलनायकाचा निप्पातही करतात. ही त्यांची हुकमी थीम या चित्रपटात सर्वधर्मसमभाव पध्दतीने मांडली.
या चित्रपटातील तीन भाऊ एकाच वेळेस आपल्या आईला रक्तदान करतात, असाही एक हास्यास्पद प्रसंग या चित्रपटात आहे. पण प्रेक्षकांना तेही आवडले. विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, ऋषि कपूर, शबाना आझमी, परवीन बाबी, नीतू सिंग यांच्यासह निरुपा राॅय, प्राण, युसुफ खान, मुकरी, जीवन इत्यादींच्या या मल्टीस्टार कास्ट चित्रपटात भूमिका आहेत.
आनंद बक्षी यांच्या गीताना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे. तय्यब अली जान का दुश्मन, माय नेम इज ॲन्थनी गोल्सान्विस, शिरडीवाले साईबाबा, परदा है परदा, हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे अशी या चित्रपटातील सगळीच गाणी सुपरहिट आहेत. एकाच चित्रपटात कव्वाली, भक्ती गीत, पाॅप गीत असा मेळ घालण्यात आल्याने हा चित्रपट महामनोरंजक झाला. दिग्दर्शक मनमोहन देसाईं यांच्या कारकिर्दीतील हा हायपाॅईंट चित्रपट आहे. याच चित्रपटावरुन तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत रिमेक करण्याची आली.
शब्दांकन : दिलीप ठाकूर