टीम AM : मेटाच्या मालकीच्या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपमध्ये कुणाला मेसेज पाठवण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर असणे बंधनकारक आहे. अनेकदा युजर्सना त्रास होतो की, जेव्हा ते एखाद्याला व्हॉट्सॲप मेसेज पाठवतात तेव्हा त्यांचा नंबर आपोआप शेअर होतो.
आता प्लॅटफॉर्मने त्याशी संबंधित अधिक चांगली प्रायव्हसी देण्याच्या दिशेने पावले उचलली असून युजर्सच्या मोबाइल नंबर ऐवजी त्यांचे युजरनेम दाखविण्यात येणार आहेत.
फोन नंबरची गरज भासणार नाही
व्हॉट्सॲपचे नवे फीचर सध्या डेव्हलपमेंट मोडमध्ये असून ते युजर्सला युजरनेम सेट करण्यास सांगेल. ज्याप्रमाणे युजर्स आपल्या इन्स्टाग्राम किंवा ट्विटर अकाऊंटसाठी युजरनेम निवडतात, त्याचप्रमाणे त्यांना व्हॉट्सॲपसाठीही एक युनिक युजरनेम तयार करावे लागेल. येत्या काही दिवसांत कॉन्टॅक्ट नंबरच्या जागी हे युजरनेम दिसेल आणि व्हॉट्सॲपवर कोणालाही मेसेज करण्यासाठी त्याच्या फोन नंबरची गरज भासणार नाही.
बीटा व्हर्जनमध्ये नवीन बदलांचे संकेत
व्हॉट्सॲप अपडेट्स आणि नवीन फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या प्लॅटफॉर्म डब्ल्यूएबीटाइन्फोने नवीन अँड्रॉइड बीटा बिल्डमध्ये नवीन बदलांचे संकेत दिले आहेत. गुगल प्ले स्टोअरवरील अँड्रॉइड व्हर्जन 2.23.11.15 अपडेटसाठी नवीनतम व्हॉट्सॲप बीटा या बिल्डमध्ये एक प्रमुख वैशिष्ट्य दर्शविते. शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असे दिसून आले आहे की व्हॉट्सॲपवरील ॲप सेटिंग्जमध्ये लवकरच नवीन युजरनेम मेनू दिसू शकतो.
प्रोफाईल सेक्शनमध्ये या सेटिंग्ज दिसतील
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ॲप सेटिंग्जमध्ये युजर्सना त्यांचे युजरनेम सेट करण्याचा ऑप्शन दिला जाईल, ज्याच्या मदतीने ते इतरांशी कनेक्ट होऊ शकतील. हे युजरनेम चॅटिंग ॲपवर ओळख म्हणून काम करेल आणि त्याच्याशी संबंधित सेटिंग्ज प्रोफाइल सेक्शनचा भाग बनवता येतील. सध्या युजर्सला आपलं नाव, प्रोफाईल फोटो किंवा ॲक्टिव्ह स्टेटस बदलण्याचा पर्याय दिला जातो. ज्या युजरचा नंबर सेव्ह केलेला नाही त्याने दिलेले नाव नंबरसह उर्वरित कॉन्टॅक्ट्सना दिसत आहे.
मोबाईल नंबरचे काम संपणार
नवीन युजरनेम निवडल्यानंतर व्हॉट्सॲप युजर्सचे मोबाइल नंबरवरील अवलंबित्व पूर्णपणे संपणार आहे. व्हॉट्सॲप केवळ कॉन्टॅक्ट आयडेंटिफिकेशनसाठी फोन नंबरची मदत घेईल, पण ते इतरांना शेअर केले जाणार नाही. फोन नंबरऐवजी युजरनेम ॲपवर दाखवण्यात येणार असून या युजरनेमच्या मदतीने कुणाशी तरी चॅटिंगही सुरू करता येणार आहे. मात्र व्हॉट्सॲपवर युजरनेमशी संबंधित यंत्रणा कशी काम करेल, याची उर्वरित माहिती येत्या काही आठवड्यात समोर येऊ शकते.