टीम AM : विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा रुजवणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व विकास आणि कौशल्याधारीत प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या पुढचे शिक्षण हे मराठीतूनच होणार असल्याने पालकांनी आता इंग्रजी माध्यमाचा हव्यास सोडायला हवा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. खासगी शाळांतील प्रत्येक उपक्रमात पालकांना आर्थिकदृष्ट्या सहभागी होणे शक्य नाही. अशावेळी मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. खासगी शाळांमध्ये शिकवले जाणारे सर्व विषय सरकारी शाळांमध्ये शिकवले जातात. केवळ इंग्रजीच्या हव्यासापोटी पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीला बळी पडू नये. या पुढचे शिक्षण हे मराठीतूनच असणार आहे. पालकांनीही आता इंग्रजी माध्यमाचा हव्यास सोडायला हवा. खासगी प्राथमिक शिक्षणाला शक्य तेवढी शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्वप्राथमिक शाळा आता कायद्याच्या कक्षेत आल्या आहेत. त्या संदर्भात केसरकर म्हणाले, की पूर्वप्राथमिक शाळांना सरकारी परवानगी आणि त्यांच्यावरील नियमनासाठी कडक निर्बंध लादले जाणार आहेत.