टीम AM : नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात लागू झाल्यानंतरही दहावी – बारावीची बोर्डाची परीक्षा होणारच आहे. पुढील वर्षी देखील दहावी – बारावीची बोर्डाची परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणेच होणार आहे,” असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी – बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार नसल्याचा गैरसमज विविध स्तरातून पसरविला जात आहे. यावर गोसावी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
देशभरात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची चर्चा सुरू आहे. या धोरणातील तरतुदीनुसार दहावी – बारावीची बोर्डाची परीक्षा रद्द होणार, शालेय शिक्षणात विविध टप्प्यावर परीक्षा होणार का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
परिणामी विद्यार्थी – पालक एवढंच नव्हे तर शिक्षक – मुख्याध्यापक, शाळा प्रशासन यांचा गोंधळ उडाला असून संभ्रमावस्था आहे. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल जाहीर करताना गोसावी यांनी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत माहिती दिली.
गोसावी म्हणाले,’ ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दहावी – बारावीची बोर्डाची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ त्या परीक्षा सत्र पद्धतीने घेण्याबाबत सुचविले आहे. त्यावर राज्य सरकार जो निर्णय घेईल, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे दहावी – बारावीच्या परीक्षा होणारच आहेत. त्याशिवाय इयत्ता पाचवी आणि आठवीच्याही परीक्षा घेण्याबाबत धोरणात म्हटले आहे.’
त्यामुळे पुढील वर्षी देखील प्रचलित पद्धतीनेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही गोसावी यांनी सांगितले.