विचार चांगले तर हृदय आनंदी !

सतत सकारात्मक कसं राहता येणार ? असा प्रश्न अनेक जण विचारतात पण खरंतर सकारात्मक राहणं ही मेंदूला सवय लावण्याची बाब आहे. कारण आपलं संपूर्ण शरीर आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांना सातत्याने प्रतिसाद देत असतं हे आता संशोधनातून सिद्ध होऊ लागलं आहे, त्यामुळे चांगले आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर सकारात्मक राहण्याची सवय मेंदूला लावलीच पाहिजे.

आपल्या मनातील नकारात्मक भावना आपल्या ह्रदयावर परिणाम करतात का व तो कशाप्रकारे हे जाणून घेण्यासाठी कॅनडा मधील रॉयटर्स या संस्थेने सलग 10 वर्ष 1739 पुरुष व स्त्रिया यांच्यावर संशोधन केले. यामध्ये काही प्रशिक्षित परिचारिकांनी सदर संशोधनात सहभागी झालेल्या स्त्रिया व पुरुष यांच्या हृदयची स्थिती व त्यावर त्यांच्या मनातील सकारात्मक व नकारात्मक भावनांमुळे होणारा परिणाम अभ्यासला.

नकारात्मक भावना, अर्थात नैराश्य, चिंता, वैर भावना ई. तर सकारात्मक भावना म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य, समाधान ई. भावनांच्या आंदोलनांनी ह्रदयावर काय परिणाम होतो हे या संशोधनाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

याकरिता सकारात्मक भावनेच्या परिणामाला ‘सकारात्मक परिणाम’ असे म्हटले गेले. सर्व भावना ‘अजिबात नाही’ ते ‘खूप जास्त’ या पातळीवर तपासल्या गेल्या आणि या सर्व पातळ्यांवर ह्रदयाच्या धोक्यात 22% नी घट झाल्याचे दिसून आले. याचाच अर्थ सकारात्मक विचारांमुळे ह्रदयावरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी होतो असे म्हणता येईल. 

या संशोधनातील प्रमुख संशोधक करीना डेव्हिडसन (कोलंबिया युनिव्हर्सिटी) म्हणतात, ‘या संशोधनातून स्पष्ट होते की सकारात्मक भावनेमुळे ह्रदय रोग अथवा इतर ह्रदायाशी निगडीत आजारांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येणे सहज शक्य आहे. त्याचबरोबर आम्हाला या संशोधनात असेही आढळून आले की समजा एखादा आनंदी व्यक्ती काही कारणाने उदास, निराश झाला तरीही त्याच्या मूळ आनंदी स्वभावामुळे त्याच्या ह्रदयावर ताण येण्याचे प्रमाण अशा नकारात्मक भावना असूनही कायम कमीच असते.’

मुळातच आनंदी असणाऱ्या माणसांना कालपरत्वे नाकारात्माकातेला सामोरे जावे लागले तरी ते त्यातून चटकन बाहेर पाडतात. म्हणूनच की काय त्यांचे ह्रदय कायम आनंदी व कोणत्याही परिस्थितीत ताण हाताळण्यास समर्थ ठरते. आनंदी हृदय हीच दीर्घायुष्याची गुरुकिल्ली असं म्हणता येईल. पण आनंदी राहण्याची सवय जोवर आपण मेंदूला लावत नाही आणि तशा जोडण्या मेंदुमध्ये जाणीवपूर्वक तयार करत नाही तोवर त्याचे परिणाम हृदयावर आणि शरीरावर दिसणार नाहीत. नकारात्मक विचार मनात आले तरी ते स्वीकारून, मग सारून सकारात्मक विचारांचा स्वीकार ह्याच पद्धतीने गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: आजच्या धकाधकीच्या जगण्यात. जिथे मानसिक, शारीरिक, इतकंच नाही तर वैचारिक स्वास्थ्यही तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. 

मुक्ता चैतन्य