टीम AM : राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात गेल्या 15 दिवसांपासून मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानाने चाळीशी ओलांडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
उष्णतेमुळं सामान्यांची लाही – लाही होत असून अनेक लोक भरदिवसा बाहेर पडणं टाळत असल्याचं दिसून येत आहे. संभाजीनगर, जालना, बीड, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं आता नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यात उष्णतेमुळं चार लोकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आता आरोग्य विभागाने वाढत्या उष्णतेमुळं हाय अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचं तापमान चाळीस अंशावर पोहचलं आहे. अकोला, नाशिक, चाळीसगाव, संभाजीनगर, बीड, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचं तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहचलं आहे. याशिवाय राज्यातील तब्बल 20 जिल्ह्याचं तापमानाने चाळीशी ओलांडल्याने नागरिकांच्या जीवाची लाही – लाही होत आहे.
भरदुपारी लोक बाहेर पडणं टाळत असल्यामुळं रस्ते निर्मनुष्य होत असल्याचं दिसून येत आहे. मे महिना संपत असला तरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील हवामानात अचानक बदल होत असल्यामुळं आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहे. तसेच लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांना घराबाहेर पडू न देण्याचंही आवाहन करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चार लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता, त्यामुळं दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे आणि बाहेर पडणं टाळण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.