बँकेतून 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया आजपासून सुरु : ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

टीम AM : 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयाची नोट चलनात वापरता येणार आहे. कोणत्याही बँकेत जाऊन तुम्हाला 2000 रुपयांची नोट बदलता येणार आहे. एकावेळी किमान 10 नोटा बदलता येतील. म्हणजेच एकाचवेळी याचे मूल्य 20 हजार रुपये आहे.

आरबीआयने नोटा बदलण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी दिला आहे. ‘आरबीआय’ च्या मार्गदर्शक तत्वानुसार, 23 मे ते 30 सप्टेंबर दरम्यान 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जाऊन बदलता येतील अथवा बँक खात्यात जमा करता येतील. ज्या लोकांकडे स्वत:चे बँक खाते नाही, असे लोकंही या 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करु शकतात.

क्लीन नोट पॉलिसीचा भाग

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सोमवारी मिडियाला सांगितले की, 2000 रुपयांची नोट बंद करणे हा क्लीन नोट पाॅलिसीचा भाग आहे. जो चलन व्यवस्थापनाच्या अंतर्गत येतो. देशातील नागरिकांना नोटबदलीसाठी 4 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. हा कालावधी पुरेसा आहे. नोट बदल करण्यासाठी ग्राहकांनी कोणत्याही प्रकारे घाई करु नये, असेही त्यांनी सांगितले.

बाजारात 2016 च्या नोटबंदीच्या काळात 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. पण आता चलनातील त्याचा हेतू पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता बाजारातून या नोटा काढून घेण्यात येत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. सध्या बाजारात इतर 500, 1000 रुपयांच्या मुबलक नोटा आहेत. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करु नये. रिझर्व्ह बँक तुमच्या समस्येचे निराकरण करण्यास तत्पर असल्याचेही गव्हर्नरांनी सांगितले.