टीम AM : ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है…. ‘या मूळ लोकगीताचे चित्रपट गीतात रुपांतर झालेल्या गाण्याने तुफान लोकप्रिय झालेल्या प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘लावारिस’ (रिलीज 22 मे 1981) च्या प्रदर्शनास आज यशस्वी 43 वर्षे पूर्ण होत आहेत.
या गाण्यातील अमिताभ बच्चनने घेतलेली स्त्रीयांची रुपे त्या काळात उलटसुलट चर्चेचा विषय रंगला होता. खुद्द अमिताभ बच्चनने हे गाणे गायले आहे.
अंजान यांनी हे चित्रपट गीत लिहिले आहे आणि कल्याणजी – आनंदजी यांचे संगीत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनने हीरा ही अष्टपैलू चतुरस्र व्यक्तिरेखा साकारलीय. या चित्रपटात झीनत अमान, रणजित, राम सेठी, श्रीराम लागू तसेच अमजद खान आणि राखी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाची पटकथा शशी भूषण, कादर खान, प्रकाश मेहरा आणि दिनदयाल शर्मा यांनी लिहिली आहे. छायाचित्रण एन. सत्येन यांचे आहे.
या चित्रपटातील सगळी गाणी आजही लोकप्रिय आहेत. मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है.. हे गाणे अलका याज्ञिकच्याही आवाजात असून ते पडद्यावर राखी साकारते.
याशिवाय जिसका कोई नहीं उसका खुदा है यारो, कब के बिछडे हुये, काहे पैसे पे इतना.. ही अंजान लिखित तर अपनी तो जैसे तैसें हे प्रकाश मेहरा लिखित गाणे या चित्रपटात आहे. मुंबईत मेन थिएटर अलंकार येथे या चित्रपटाने खणखणीत सुवर्ण महोत्सवी यश संपादले.
शब्दांकन : दिलीप ठाकूर