अंबाजोगाई : पखावजचा ठेका व मधुर बासरीवादन यांची अनोखी जुगलबंदी अंबाजोगाईकरांना अनुभवता आली. नांदेड येथील प्रसिद्ध बासरीवादक शेख ऐनोद्दीन व आंतरराष्ट्रीय कीर्तिचे पखावजवादक उद्धवराव आपेगावकर यांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात पखावज व बासरीच्या जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले होते. संगीत क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यासाठी पं. उद्धवराव आपेगावकर यांचे नाव घेतले जाते. यापूर्वीही सितारवादन व पखावज व आता बासरी व पखावज यांची जुगलबंदी ही अनोखी किमया त्यांनी उपस्थितांसमोर साध्य केली. नांदेड जिल्ह्यातील शेख ऐनोद्दीन हे प्रसिद्ध बासरीवादक पं. रेणु मुजुमदार यांचे शिष्य आहेत तर उद्धवराव आपेगावकर हे पद्मश्री कै. शंकरबापू आपेगावकर यांचे शिष्य आहेत. दोन्ही कलावंतांची योगेश्वरी मातेसमोर झालेली संगीत आराधना उपस्थित श्रोत्यांना मनस्वी आनंद देणारी ठरली.
शेख एैनोद्दीन यांनी आपल्या बासरीवादनातून योगेश्वरी देवीच्या गितांची सुरेल बरसात केली तर त्यांना उद्धवरावांनी तितक्याच तोलामोलाची साथ दिली. योगेश्वरी देवीची आराधना करणाऱ्या दुर्गा रागाच्या माध्यमातून सात मात्रांची बंदिश या बंदिशीला पखवाजाचा ताल सुसंगत ठरतो. तर दहाव्या मात्रेच्या बंदिशीत सूर-ताल यामध्ये रंगलेली जुगलबंदी अनोखी ठरली. भैरवीने या जुगलबंदीचा समारोप झाला.
प्रारंभी योगेश्वरी देवीच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत देवल कमिटीचे सचिव भगवानराव शिंदे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे यांनी केले. यावेळी पूजा राम कुलकर्णी, गौरी जोशी, गिरीधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, अॅड. शरद लोमटे, संजय भोसले, सारंग पुजारी, यांच्यासह रसिकश्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.