पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्यासाठी चार जागांना मान्यता
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या (टी.बी.) छाती विकार व क्षयरोगशास्त्र विभागास (टीडिडि) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चार जागांना वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या टी. बी. विभागाला गतवैभव मिळणार आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या वतीने २० सप्टेंबर २०१९ रोजी काढलेल्या आदेशानुसार अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. वै.महाविदयालयाच्या छाती विकार व क्षयरोगशास्त्र विभागास सीपीएस (कॉलेज ऑफ फिजीशिएन व सर्जन ऑफ बाॅम्बे) या संस्थेच्या वतीने टीडिडि (डिप्लोमा इन ट्युबरक्लोसिस डिसीजेस्) या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षापासूनच या जागा भरण्यासाठीच्या सुचना या शासकीय आदेशात अधिष्ठाता यांना देण्यात आल्या आहेत. या आदेशावर वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे अवर सचीव अजित सासुलकर यांची स्वाक्षरी आहे.
अंबाजोगाई येथे स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेअगोदर अंबाजोगाईची ओळख असलेल्या टी.बी. वार्डला या नव्या शासकीय आदेशामुळे पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या माध्यामातून होत आहे. तीन महिन्यापुर्वी छातीविकार व क्षयरोग शास्त्र या विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. सदरील प्रस्तावात वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची भुमिका महत्त्वाची आहे.आता या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयाच्या छाती विकार व क्षयरोगशास्त्र विभागास पुन्हा गतवैभव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नैसर्गिक साइडचा रुग्णांना लाभ मिळवून देणार स्वा.रा.ती. वै. महाविद्यालयाची साइड ही टी.बी. रुग्णांना उपचारासाठी खुप चांगली साइड असून या साइडमुळे येथील सामान्य रुग्णालय हे टी. बी. रुग्णांसाठी वरदान ठरले होते. आता याच परिसरात मोठ्या प्रमाणावर टी.बी. रुग्ण अत्याधुनिक उपचार सुविधांच्या सहाय्याने रोगमुक्त करु असा विश्वास या विभागाचे प्रमुख डॉ. विवेकानंद वाघमारे व सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल मस्के यांनी व्यक्त केला आहे.