भाजपकडून नमिता मुंदडा यांचा तर वंचित बहुजन आघाडीकडून वैभव स्वामींचा उमेदवारी अर्ज दाखल

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज दि. 4 आक्टोंबर रोजी दोन प्रमुख पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात भाजपकडून नमिता मुंदडा यांचा तर वंचित बहुजन आघाडीकडून पत्रकार वैभव स्वामींचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला.

केज विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला राजकीय रंग चढत असून राजकीय समीकरणे रोजच बदलत आहेत. राष्ट्रवादी नंतर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी वरुन राजकीय पेच निर्माण झाला होता. परंतु ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मागितलेल्या पत्रकार वैभव स्वामींना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज भाजपकडून नमिता मुंदडा यांनी तर वंचित बहुजन आघाडीकडून वैभव स्वामींनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना खा. डॉ. प्रितमताई मुंडे, आमदार संगिता ठोंबरे, सचिन मुळुक यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान आता केज विधानसभा मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादी, मित्रपक्ष आणि भाजप – शिवसेना मित्रपक्ष  आणि वंचित बहुजन आघाडी या तिनही प्रमुख पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आज भाजपकडून मोठे शक्ति प्रदर्शन करण्यात आले.