केज मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार – वैभव स्वामी

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वैभव स्वामी यांनी पत्रकारांशी साधला संवाद

अंबाजोगाई : केज मतदार संघात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वैभव स्वामींनी केले. शहरातील पत्रकारांशी वैभव स्वामींनी हॉटेल साई पॅलेस येथे संवाद साधला.

पत्रकारांशी बातचीत करताना वैभव स्वामी म्हणाले की, केज मतदार संघाच्या विकासाचे दावे करण्यात आले, मात्र अंबाजोगाईकरांना माहित आहे की खरा विकास कोणाचा झाला आहे. केज मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराची सारखीच परस्थिती आहे. विचारधारेशी नैतिकता नसणारे लोक सामान्य जनतेचे कसे होतील असा सवाल स्वामींनी उपस्थित केला. लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने व सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला उमेदवारी दिली आहे. माझे आजोबा रामलिंग स्वामी हे श्रेष्ठ देशसेवक होते. हैद्राबाद मुक्ती संग्रामात त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना साथ दिली आहे. केज मतदार संघात विकासाची पाऊलवाट आमदार रामलिंग स्वामींनी केली. त्यांच्या कार्याचा वारसा मी पुढे चालू ठेवणार आहे असेही स्वामींनी सांगितले.

केज मतदार संघातील प्रलंबित प्रश्नासोबत गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला अंबाजोगाई जिल्हयाचा प्रश्न, बुटटेनाथ साठवण तलावाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले. गेली अनेक वर्ष माध्यमात कार्यरत असल्यामुळे सामान्य जनतेसोबत पत्रकारांचेही अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वैभव स्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

या पत्रकार परिषदेला भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रा. बळीराम सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर लांडगे, जिल्हासचिव अरूण बनसोडे, तालुकाध्यक्ष अभय सोनवणे, सुशांत सोनवणे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.