अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी अष्टमीच्या मुहुर्तावर सकाळी सात वाजता पुर्णाहुती, होमहवन व महापुजेने योगेश्वरी देवीची महापुजा झाली. तहसीलदार संतोष रूईकर व कमल संतोष रूईकर यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
२९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. रविवारी सकाळी मंदिरात पुर्णाहुती व होमहवन होऊन महापुजा झाली. या महापुजेसाठी देवल कमिटीचे सचिव भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त राजकिशोर मोदी, कमलाकर चौसाळकर, अक्षय मुंदडा, माजी आ. पृथ्वीराज साठे, अॅड. शरद लोमटे, उल्हास पांडे, प्रा. अशोक लोमटे, गिरीधारीलाल भराडिया, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, पूजा राम कुलकर्णी, गौरी जोशी, यांच्यासह पुरोहित व मानकरी यांची उपस्थिती होती.
गेल्या आठवडाभरापासून मंदिर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन सुरू आहे. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दूरदूर ठिकाणाहून भाविकांची योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच भाविकांना विविध सेवा व सुविधा देवल कमिटीच्या वतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. रविवारी पूर्णाहुती पडल्यानंतर महिला व भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
मंगळवारी योगेश्वरी देवीच्या पालखीने श्री नवरात्र महोत्सवाची सांगता होणार असुन विजयादशमीच्या निमित्ताने देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी शहरातून निघणार आहे. दुपारी एक वाजता पालखी मंदिरातून निघणार आहे. प्रतिवर्षी ठरल्याप्रमाणे नियोजित मार्गाने पालखीचे मार्गक्रमण होणार आहे. अशी माहिती देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार संतोष रूईकर, सचिव भगवानराव शिंदे यांनी दिली.