नऊ कृतीशील महिलांचा करण्यात आला सन्मान
अंबाजोगाई : रविवारी सायंकाळी पार पडलेल्या दिमाखदार समारंभात विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने छाप उमटविणाऱ्या नऊ कृतीशील महिलांना यंदाच्या नवकेशर नवरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी आणि टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य खडकभावी यांच्या हस्ते या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
अंबाजोगाई येथील नवकेशर प्रतिष्ठानच्या वतीने नवकेशर नवरत्न पुरस्कार देण्यात येतात. विविध क्षेत्रात स्वत:च्या योगदानाने कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येते. यावर्षी मीना सोमशंकर गिरवलकर (संकाये), संत धुराबाई, भाग्यश्री शत्रुघ्न खोसे, वीरश्री दिगांबर डाके, डॉ. मिताली गोलेच्छा, महादेवी अष्टेकर, अनिता सीता कांबळे आणि ललिता चव्हाण या महिलांना राजकिशोर मोदी आणि प्राचार्य खडकभावी यांच्या हस्ते नवकेशर नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार विजेत्या उषा रामधामी या मात्र काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत.
यावेळी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की, सांस्कृतिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत नवकेशर प्रतिष्ठानने आयोजित केलेला नवकेशर नवरत्न पुरस्कार सोहळा अतिशय कौतुकास्पद बाब आहे. आगामी काळात नवकेशर हे अंबाजोगाई नगरीला सांस्कृतिक क्षेत्रात यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल असे गौरवोद्गार मोदींनी काढले. तर, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नवकेशर नवरत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी भीमाशंकर शिंदे यांनी जो सन्मान केला ही बाब येणाऱ्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. तसेच सन्मान पात्र माता भगिनींना त्यांच्या पुढील कार्यासाठी ऊर्जा देणारी आहे. सांस्कृतिक क्षेत्र हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक संदेश देण्याचे एक मोठे माध्यम आहे. हे या ठिकाणी नवकेशर प्रतिष्ठानने दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन प्राचार्य खडकभावी यांनी केले.
या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमाशंकर शिंदे यांना डॉ. राहुल धाकडे, सचिन हिरवे, गणेश तौर, सुनील व्यवहारे, सुशील कुंबेफळकर, विशाल ओव्हाळ, प्रदीप भालेराव, धम्मानंद वाघमारे, विष्णू डाके, अक्षय कांबळे, कान्होपात्रा शिंदे, आरती लिंबगावकर, शुभम जोगदंड, सत्यम जोगदंड यांचे सहकार्य लाभले.