हजारो भाविकांनी घेतले श्री योगेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन
अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या सिमोल्लंघनासाठी निघालेल्या भव्य पालखी सोहळ्याने नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. शहर व परिसरातील हजारो भाविकांनी देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आई राजा … उदो… उदो….. च्या जयघोषात पालखी मंदिरातून मार्गक्रमण झाली.
श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त मंगळवारी दुपारी योगेश्वरी देवीच्या मंदिरात विधीवत महापुजेनेनंतर पालखी सिमोल्लंघनासाठी निघाली. फटाक्यांची भव्य आतिषबाजी, पारंपारिक वाद्य, ढोलताशांचा गजर व आराधी भाविकांचे भजनी मंडळ यांच्या मेळ्यात पालखीचे मार्गक्रमण झाले. शहरात ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालखीसोबत आराध्यांचा मोठा ताफा सहभागी झाला होता. भजनी मंडळे, आराध्यांची गीते, सनई, चौघाडाच्या गजरात पालखी शहरातून निघाली. शहरवासियांनी ठिकठिकाणी पालखीचे जंगी स्वागत केले. दारासमोर सडा, रांगोळ्या, देवीचे औक्षण, खणा- नाराळाने महिला भाविक भक्तांनी ठिकठिकाणी ओटी भरून स्वागत केले. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने योगेश्वरी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
स्व. प्रेमचंदजी कुंकुलोळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आराधी महिलांना फरळाचे वाटप
योगेश्वरी देवीच्या पालखी सोबत असणाऱ्या आराधी महिलांना स्व. प्रेमचंदजी कुंकुलोळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आराधी महिलांना फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी चार हजार महिलांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे संयोजक उद्योगपती रसिक कुंकुलोळ, संतोष कुंकुलोळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आराधी महिला व भाविकांना फराळांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, माजी आ. पृथ्वीराज साठे, अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा, गिरीधारीलाल भराडिया व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविवारपेठ मित्र मंडळाचे आनंद टाकळकर, धनराज सोळंकी, राहुल पेडगावकर, सतीश दहातोंडे, किरण सेलमोहकर, बाळा पाथरकर, संदेश जोशी, प्रशांत सेलमोहकर, सचिन भातलवंडे, सतीश कुलथे, बाळासाहेब पाथरकर, महेश नाईक, प्रतिक दहातोंडे, वरद दहातोंडे, सुनिल मुथा, वरद मुडेगांवकर यांच्यासह भाविक भक्त व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.