साठेंच्या विजयासाठी मोदी मैदानात; मोर्चेबांधणी सुरू

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत दिवसागणिक राजकीय समीकरणे बदलत असुन ‘अभी नहीं तो कभी नहीं, म्हणत राष्ट्रवादीची टीम कामाला लागली आहे. यात आणखी भर म्हणून अंबाजोगाई शहरावर राजकीय पकड मजबूत असणाऱ्या राजकिशोर पापा मोदी यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरत माजी आमदार पृथ्वीराज साठेंना विजयी करण्यासाठी प्रचार यंत्रणा हातात घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहरात मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसचा नक्कीच राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.

केज मतदार संघात महत्वाचे केंद्र असलेल्या अंबाजोगाई शहरातच दीर्घ काळ केज मतदार संघाची सत्ता राहिली आहे. अंबाजोगाई शहर मतदार संघातील मोठे शहर असल्याने या शहरातील मतदारांना प्रभावित करण्याकडेच राजकीय नेत्यांचा कल असतो. त्याचे कारण अंबाजोगाई शहराची लोकसंख्या आणि त्यात असणारी मतदारांची संख्या आहे. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या शहरावर नेहमी पुरोगामी विचारांचा पगडा अधिक राहिला आहे. त्यामुळे भाजपा पेक्षा अधिक काँग्रेस –  राष्ट्रवादी पक्षानेच येथे सत्ताकेंद्र ताब्यात ठेवली आहेत. अंबाजोगाई शहरातील राजकारणावर ज्यांचा प्रभाव आहे असे राजकिशोर मोदी भाजपला शह देण्यासाठी आणि मित्रपक्षाचा आमदार करण्यासाठी सक्रीय झाले आहेत. त्यासाठी मोदींनी नगरसेवक व कार्यकर्त्यांची  बैठक देखील घेतली. या बैठकीत भाजपला सत्तेपासून रोखत साठेंना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. तशा कार्यकर्त्यांना सुचना देखील दिल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोदींच्या रुपान भक्कम पाठींबा मिळाला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीनेही अंबाजोगाई शहरातील प्रचाराची यंत्रणा व धुरा मोदींकडे सोपविली आहे.

त्यानूसार  10 आक्टोंबर रोजी साठेंच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत सहभागी होत मोदींनी प्रचार यंत्रणेची गती वाढविली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या या रणनीतीला भाजप कसा शह देते हे येत्या काही दिवसांत कळेल. पण मोदींनी प्रचाराची धुरा हाती घेतल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार असणारे पृथ्वीराज साठेंची प्रचार यंत्रणा मजबूत झाली आहे. त्यामुळे माजी आमदार साठे यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसुन येत आहे.