टीम AM : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेले आणि राज्याची कुलस्वामिनी आई म्हणून ओळख असलेल्या तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी नियम लागू करण्यात आले आहेत.
मंदिराच्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या नियमावलीनुसार तुळजाभवानी मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे मंदिरात लावण्यात आलेल्या फलकांवर लिहिण्यात आले आहे.
अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, अशा आशयाचे फलक मंदिर परिसरात मंदिर संस्थानाकडून लावण्यात आलेले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मंदिर संस्थानच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची अंमलबजावणी आज गुरुवारपासून सुरु झाली आहे. यानिमित्ताने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) नागेश शितोळे यांचा सर्व पुजारी वर्गाकडून सत्कार करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त महिलांनाच हा नियम लागू न करता पुरूषांना सुद्धा कपड्यांच्या संदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार आहे.