सर्व स्तरांतून होतयं अभिनंदन
टीम AM : योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या ‘एनसीसी’ विभागातील पाच मुलींची नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या मुली ‘एनसीसी’ मध्ये पोलीस भरतीची सर्व तयारी करून निवड प्रक्रियेला सामोरे गेल्या. या चारही मुली अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील असून ज्यांची मुंबई पोलीस दलात निवड होणे संस्थेच्या ‘एनसीसी’ विभागाच्या दृष्टीने अत्यंत गौरवाची बाब आहे. या मुलींनी योगेश्वरी ग्राऊंडवर अपार कष्ट व मेहनत केली आहे. त्याचबरोबर रक्त आणि घाम गाळून पोलीस भरतीसाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. या शेतकरी कुटुंबातील मुली समाजासाठी एक उदाहरण आहेत.
कुटुंबातील परिस्थिती हालाखीची असून सुद्धा परिस्थितीवर रडत न बसता अपार कष्ट व मेहनत करून आपल्याला आपले ध्येय गाठता येते, याबद्दलचे हे उदाहरण आहे. यावेळी या मुलींनी आपली भावना व्यक्त करताना योगेश्वरी शिक्षण संस्था व ‘एनसीसी’ विभागामुळे आम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकलो व त्यामध्ये यश मिळवू शकलो असे उद्गार काढले आहेत. या आधी अशाच चार मुलींची पोलीस दलात निवड झाली आहे. म्हणजेच एकूण आठ मुलींची पोलीस दलात निवड झाली असून यामध्ये रेश्मा पोटभरे, भाग्यश्री सोन्नर, निकीता गोचडे, विशाखा चाटे, पौर्णिमा सिरसाट यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या ‘एनसीसी’ विभागातील मुली पोलीस दलात निवड होणे ही अत्यंत गौरवाची बाब असून गरीब शेतकरी कुटुंबातील मुली कष्ट आणि मेहनतीच्या बळावर आपले ध्येय गाठू शकतात, याचेच हे उदाहरण आहे – डॉ. सुरेश खुरसाळे, अध्यक्ष योगेश्वरी शिक्षण संस्था
राष्ट्रीय छात्र सेना ही विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच शिस्त व राष्ट्रीयत्वाचे धडे देते. ‘एनसीसी’ च्या माध्यमातून विद्यार्थी देशसेवेसाठी तत्पर होतात व राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवतात, याचा आम्हाला अभिमान आहे – मेजर एस. पी. कुलकर्णी