टीम AM : मराठी चित्रपटसृष्टी मधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी ओळखली जाते. ती सतत चर्चेत असते. कधी सोनालीच्या आगामी चित्रपटांची चर्चा रंगते तर कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टची.
सोनाली कुलकर्णीने लॉकडाऊनच्या काळात कुणाल बेनोडेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला केवळ कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. आज 18 मे रोजी सोनाली कुलकर्णीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या काही खास गोष्टी.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चा जन्म 18 मे 1988 रोजी खडकी, पुणे येथे झाला. सोनाली कुलकर्णी मुळची पुण्याची आहे. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केले आहे. तिच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील ‘सीओडी’ येथे काम केले आहे.
सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालय येथे झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय येथे झाले आहे. तिने फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. तसेच पुणे येथील इंदिरा स्कुल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
सोनाली कुलकर्णीने कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सोनालीने केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला ‘झी गौरव पुरस्कार’ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या ‘नटरंग’ ह्या चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ ह्या लावणीवरील नृत्यासाठी ओळखली जाते. ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने ‘क्षणभर विश्रांती’, ‘अजिंठा’, आणि ‘झपाटलेला 2’ अशा चित्रपटामध्ये काम केले.
2014 मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत ‘मितवा’ हा चित्रपट केला होता, ज्याच्यासाठी तिला ‘झी गौरव पुरस्कार’ च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले. स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतून हिंदी चित्रपटांकडे गेलेल्या काही मोजक्याच अभिनेत्रींना यश मिळाले आहे. यात सोनाली कुलकर्णीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
सोनाली कुलकर्णीने ‘ग्रँड मस्ती’ ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला, ज्यात तिने रितेश देशमुखच्या पत्नी, ममता हीची भूमिका केली होती. तसेच अजय देवगण याच्या ‘सिंघम 2’ ह्या चित्रपटात देखील सोनाली कुलकर्णीने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. सोनाली कुलकर्णीचे ‘सोशल मीडिया’ वर फॅन सुद्धा जबरदस्त आहेत. इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी भाषांतील सुमारे 80 चित्रपटांत सोनाली कुलकर्णीने अभिनय केला आहे. सोनालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.