टीम AM : राज्यातील सहकारी बँकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला – मुलींबरोबरच सर्व सामान्यांच्या उध्दार आणि समृद्धीसाठीही काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला – मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शुन्य ते 4 टक्के व्याजदराने 15 लाखांपर्यंत शेक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ सुरु करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला – मुलींना मोठा आधार दिला असून त्यांचे अश्रू पुसण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले.
कर्जाची परतफेड करण्यासाठी 10 वर्षे कालावधी म्हणजे नोकरी लागल्यानंतर परतफेड असणार आहे. पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची व जामीनदारांची आवश्यकता नाही. पाच लाख ते दहा लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल, मात्र एका जामीनदाराची आवश्यकता असेल.
10 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागेल तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल. पाच लाखांपर्यंत शुन्य टक्के, पाच लाखांच्या वर ते 10 लाखांपर्यंत 2 टक्के तर 10 लाखांच्यावर ते 15 लाखापर्यंत 4 टक्के व्याजदर असणारी योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, विधानपरिषदेचे आमदार प्रविण दरेकर, माजी मंत्री अनंत अडसुळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले तर व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी आभार मानले.