टीम AM : मराठी मनोरंजन विश्वातली बहुगुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा आज (17 मे) वाढदिवस आहे. विलक्षण बोलके डोळे आणि सहज अभिनयाच्या जोरावर मुक्ता मराठी चित्रपट सृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री बनली. नाटक, चित्रपट असो वा मालिका तीनही माध्यमांत तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे.
मुक्ताचा जन्म हा पुण्यात झाला असून, लहानपणापासून तिच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली होती. अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन मुक्ता मनोरंजन विश्वात आली आणि तिने सगळ्यांची मने जिंकून घेतली.
अभिनेत्री मुक्ता बर्वे यंदा तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाचा हा टप्पा गाठूनसुद्धा मुक्ता अजूनही अविवाहित आहे. मुक्ताने अजूनही लग्नाचा निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतत पडत असतो. मुक्ताला लग्नाबद्दल अनेकदा विचारणा झाली आहे. पण, तिने त्यावर ठोस स्पष्टीकरण कधीच दिले नाही.
मात्र, अद्याप लग्न न करण्याचे कारण सांगताना मुक्ता म्हणाली की, ‘मी आत्ता जितकी सुखी आणि आनंदी आहे त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढणार असेल, तरच मी लग्न करेन’.
मुक्ता बर्वे हे नाव जरी घेतले तरी डोळ्यांसमोर ‘जोगवा’ मधील सुली, ‘एक डाव धोबीपछाड’ चित्रपटातील अशोक सराफांची नटखट मुलगी, तितक्याच ताकदीने ‘मुंबई – पुणे – मुंबई’ मधील स्वच्छंद, स्वतंत्र विचारांची मॉर्डन मुलगी येते. भूमिका कोणतीही असो, शहरी मुलगी अथवा खेडवळ स्त्री मुक्ता आपल्या अभिनयाने ती व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत करते. मुक्ता लहानपणापासून अतिशय लाजाळू आणि बुजऱ्या स्वभावाची होती. तिचा हा स्वभाव बदलावा म्हणून, नाट्यलेखिका असलेल्या मुक्ताच्या आईने ‘रुसू नका फुगू नका’ हे मराठी नाटक लिहीले आणि मुक्ताला यात काम दिले.
या बालनाट्यातील भित्रा ससा आणि परी राणी या दोन्ही भूमिका मुक्ताने केल्या. यानंतर मुक्ताने वयाच्या 16 व्या वर्षी रत्नाकर मतकरीं च्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात काम केले. त्यानंतर मुक्ताने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण, तिला खरी ओळख ‘जोगवा’ या चित्रपटाने दिली.
यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील तिने साकारलेली राधा रसिकांच्या पसंतीस उतरली. तर, ‘मुंबई – पुणे – मुंबई’ चित्रपटात तिने साकारलेली सडेतोड, प्रॅक्टीकल गौरी सगळ्यांनाच आवडली. मुक्ताला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.