डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : 33 महाविद्यालयं येत्या शैक्षणिक वर्षासाठी अपात्र

बीड जिल्ह्यातील 11 महाविद्यालयांचा समावेश

टीम AM :  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित 33 महाविद्यालयांना येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. 

पूर्णवेळ प्राचार्य नसणं, तसंच पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेल्या अध्यापक महाविद्यालय, शारिरीक शिक्षण महाविद्यालय आणि विधी शाखेच्या महाविद्यालयाचा यामध्ये समावेश आहे.

गेल्या तीन वर्षात वारंवार सूचना देऊनही या त्रुटींची पूर्तता करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचा निर्णय कुलगुरुंनी घेतला. अपात्र करण्यात आलेल्या महाविद्यालयांमधे बीड जिल्ह्यातल्या सर्वाधिक 11 महाविद्यालयांचा समावेश आहे.

दरम्यान, पुढच्या टप्प्यात अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार असून, त्यावर देखील निर्णय घेण्यात येणार असल्याचं, विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने कळवलं आहे.