महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका लागणार ? : जितेंद्र आव्हाड यांनी केलं भाकीत

टीम AM : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पुढच्या वर्षी देशभरात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. त्याआधी राज्यात महापालिका निवडणुकांचंदेखील बिगूल वाजण्याची शक्यता आहे. असं असताना सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. 

या निकालावरुन सत्ताधारी पक्षांकडून आपल्याच बाजूने निकाल लागल्याचा दावा केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या निकालानंतर राज्यात आगामी काळात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं मोठं भाकीत केलं आहे.

सुप्रीम कोर्टाने 141 पानांची रुलबुक दिली आहे. तुम्हाला त्या रुलबुकप्रमाणेच चालावं लागणार. त्यामुळे जर – तरला काहीच अर्थ नाही. तुम्हाला ज्यादिवशी अपात्रतेचा अर्ज टाकलाय त्याचदिवशीचा विचार करायचा आहे, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे. तेव्हाचा राजकीय पक्ष कोणता होता हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. तेव्हा शिवसेना हा राजकीय पक्ष होता. त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरे यांनाच व्हीपचा अधिकार आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सुनील प्रभू यांचा व्हीप लागू होईल

‘सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालपत्रात म्हटलंय की, कोणत्याही पक्षात विधीमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्ष जास्त महत्त्वाचा आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, व्हीप नेमण्याचा अधिकार पक्षप्रमुखाला असतो, गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाला असतो, हे कालच्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून त्यांनी जजमेंट सुरु केलं तेव्हा सुनील प्रभू यांचा व्हीप लागू होईल. त्यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे हाच पक्ष होता. त्यामुळे उगाच समज गैरसमज पसरविण्यात काहीच अर्थ नाही’, असं आव्हाड म्हणाले.

महाराष्ट्रात मध्यावधी लागणार

सुप्रीम कोर्ट फार सीरियस आहे. दिल्लीच्या बाजून जो निकाल दिलाय, त्याबाबत केंद्र सरकार भूमिका घेत नाही, असं दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात जेव्हा सांगितलं तेव्हा कोर्टाने तातडीने सुनावणीचे आदेश दिले. त्यामुळे लोकांना ते वर्षभर खेचतील असं वाटतंय ना, काही खेचाखेच होणार नाही. बघा आता काय होणार आहे ते. राजकारण खूप बदलत जाईल. माझ्या अंदाजाने महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार. हे माझं वैयक्तिक मत आहे, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.