सायबर फसवणूकीचा नवीन प्रकार : ‘ही’ काळजी घ्याच

टीम AM : देशभरात सायबर फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. सायबर पोलिसांकडे फसवणुकीच्या रोज हजारो तक्रारी दाखल होत आहे. 2023 च्या पहिल्या तिमाहीत सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. फसवणूक करणारी झारखंडमधील जामतारा टोळीने देशभर आपले पंख पसरवले आहेत. या टोळीकडून लोकांना लुटण्यासाठी रोज नवनवीन पद्धती शोधल्या जात आहेत. आता या जामतारा टोळीने फसवणुकीची नवीन पद्धत समोर आली आहे. ज्यात ते ना तुमच्याशी बोलणार, ना ओटीपी विचारणार ना बँक खात्याचा तपशील…मग काय आहे ही पद्धत.

आता अशी सुरु झाली फसवणूक

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याची नवीन पद्धत आली आहे. चंदीगडमध्ये फसवणुकीचा हा प्रकार उघड झाला आहे. चंदीगडमधील एका व्यक्तीला व्हॉट्सॲपवर मेसेज आला. त्यात म्हटले होते की, इथे क्लिक केल्यावर खात्यात पैसे जमा होतील. मग त्या व्यक्तीला लालसा निर्माण झाली. त्या व्यक्तीने मेसेजवर क्लिक केले अन् त्याच्या खात्यातून 16 लाख 91 हजार रुपये कापले गेले. या व्यक्तीकडून कोणताही OTP किंवा इतर कोणतीही माहिती विचारण्यात आलेली नाही

शोधली ‘ही’ नवीन पद्धत

हल्ली बँकेचे मेसेजही व्हॉट्सॲपवरच येतात. जामतारा टोळीने असा सापळा रचला आहे की तुम्ही त्यांच्या मेसेजवर क्लिक करताच तुमचे व्हॉट्सॲप खाते हॅक होते. तुमचा बँकेचा सर्व तपशील त्यांच्याकडे जातो. त्यानंतर तुमच्या खात्यातून सर्व पैसे काढले जातात.

‘ही’ काळजी घ्याच

तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटमध्ये इथे क्लिक केल्यावर खात्यात पैसे जमा होतील, असा कोणताही मेसेज आला तरी त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. जोपर्यंत तुम्ही लिंकवर क्लिक करत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. ते नंबर ब्लॉक करा. त्यानंतरही तुम्हाला असे मेसेज वारंवार येत असतील तर सायबर क्राइम विभागाकडे तक्रार करा.

पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.