मोठी दुर्घटना : पुलावरून बस कोसळली, 15 जणांचा मृत्यू, 25 जखमी

टीम AM : मध्य प्रदेशमधील खरगोन येथे आज (दि.9) सकाळी साडेआठच्या सुमारास मोठी बस दुर्घटना घडली. खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस पुलावरून कोसळली. यामध्ये 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 25 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याची अशी माहिती खरगोनचे एसपी धरम वीर सिंग यांनी दिली आहे.

खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून – इंदूरकडे जाणारी बस अचानक बोराड नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून 50 फूट खाली कोसळली. MST हिरामणी ट्रॅव्हल्सची क्रमांक MP 10 P 7755 ही बस ओव्हरलोड होती. यामध्ये एकूण 35 प्रवाशी होते. यामधील 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लिनरचा समावेश आहे. या दुर्घटनेतील जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खरगोन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी खरगोनचे एसपी, जिल्हाधिकारी आणि आमदार पोहोचले आहेत. अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत जाहीर

मध्य प्रदेश सरकारने खरगोन बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी 25,000 रुपये तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे, अशी माहिती एएनआयने दिलेल्या वृत्तात दिली आहे.