टीम AM : सदाबहार मराठमोळी अभिनेत्री दीपाली सय्यदचा आज वाढदिवस आहे. मालिकांपासून सुपरहिट चित्रपटापर्यंत तिचा अभिनयप्रवास थक्क करणारा आहे. दिपाली सय्यद म्हणजेच दिपाली भोसले, लग्नानंतर ती दिपाली सय्यद झाली. सुरवाती पासुनच एक अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते.
दिपाली सय्यदचे बालपण मुंबईत गेले. दिपालीने नालंदा विद्यापीठातून फाईन आर्ट्सची पदवी संपादन केलेली आहे. अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास मालिकांमधुन सुरु झाला. ‘बंदीनी’, ‘समांतर’ या तिच्या अभिनय कारकिर्दीतील सुरवातीच्या मालिका. त्यानंतर अनेक चित्रपट, मालिका, शोज, नाटक, टिव्ही शोज, जाहिराती यातुन ती सातत्याने झळकत राहिली.
दिपाली ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘चश्मेबहाद्दर’, ‘लग्नाची वरात लंडनच्या दारात’ या चित्रपटांमधील तिच्या भुमिकांसाठी विशेष करुन ओळखली जाते. मात्र, तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ‘जत्रा’ चित्रपटातील ये गो ये ये मैना.. या गाण्यातून मिळाली. ‘करायला गेलो एक’, ‘लाडी गोडी’, ‘होऊन जाऊ दे’, ‘मला एक चानस हवा’, ‘ढोलकीच्या तालावर’, ‘वेलकम टु जंगल’, ‘हे मिलन सौभाग्याचे’, ‘माझ्या नवर्याची बायको’, ‘उचला रे उचला’, ‘काय करु न कसं करु’, ‘दुर्गा म्हंत्यात मला’, ‘काळशेकर आहेत का ?’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘सासु नंबरी जावई दस नंबरी’ हे तिचे तिने अभिनय केलेले इतर चित्रपट. तर ‘दुर्वा’, ‘अफलातुन’ या हिंदी मालिकांमधुनही ती चमकली आहे.
याशिवाय तिने आतापर्यंत पाच – सहा भोजपुरी चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. 31 मे 2008 रोजी दिपाली दिग्दर्शक बॉबी खान यांच्याबरोबर विवाहबध्द झाली असुन लग्नानंतरचे तिचे नांव सोफीया जहांगीर सय्यद असे आहे. दिपालीने अहमदनगर मतदार संघातुन सन 2014 मध्ये निवडणुक लढवलेली होती. दिपाली सय्यदने नगर जिल्ह्यातील ‘गुंडेगाव’ या ठिकाणी ‘दिपाली सय्यद – भोसले फाऊंडेशन’ च्या माध्यमातून वृद्ध आणि अनाथ मुलांसाठी आश्रम उभारले आहे.
शब्दांकन : संजीव वेलणकर