महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : निकालाबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी वर्तवल्या ‘या’ शक्यता

टीम AM : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. आता शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. विशेष म्हणजे यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यासह देशभरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागलं आहे. 

यासंदर्भात प्रदीर्घ काळ सुनावणी झाल्यानंतर आता लवकरच या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 16 तारखेला न्यायमूर्ती शाह निवृत्त होत आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीच्या खंडपीठामध्ये शाह यांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधीच या प्रकरणाचा निकाल लागणे अपेक्षित आहे. येत्या 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे त्याआधीच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये 11 किंवा 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या खटल्याची प्रदीर्घ सुनावणी झाली आहे. त्यावरून असीम सरोदे यांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत. त्यानुसार पहिली शक्यता म्हणजे आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला जाऊ शकतो. दुसरी शक्यता म्हणजे बहुमत चाचणी करण्यासंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काढलेला आदेशच रद्द ठरवला जाऊ शकतो.

असीम सरोदेंनी व्यक्त केलेली तिसरी शक्यता म्हणजे पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून थेट न्यायालयच 16 आमदारांना अपात्र ठरवू शकते. यासाठी घटनेतील कलम 142 चा आधार न्यायालय घेऊ शकते. बहुमत चाचणीचा आदेश ही राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याने ती रद्द ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे.

असीम सरोदेंनी चौथी शक्यता मोठ्या घटनापीठाची वर्तवली आहे. हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे 10 व्या परिशिष्टासंदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते. ही शक्यता धूसर आहे व तसे होणार नाही असे वाटते, असे असीम सरोदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.