टीम AM : मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी देखील गाजवली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे. ‘अशीही बनवा बनवी’ या आयकॉनिक मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
या चित्रपटात त्यांनी परिधान केलेली लिंबू कलरची साडी तुफान गाजली. आज (7 मे) अभिनेत्री अश्विनी भावे आपला वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…
अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच मोहित केलं. मराठीच नाही तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा जलवा दाखवला. अश्विनी भावे यांचा जन्म 7 मे 1972 रोजी मुंबईत झाला. मुंबईतील साधना विद्यालय आणि रुपारेल कॉलेज मधून त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथून फिल्म संबंधित विषयात पदविका देखील मिळवली. शिक्षणात हुशार विद्यार्थिनी असलेल्या अश्विनी भावे यांना सुरुवातीपासूनच मनोरंजन विश्व खुणावत होते.
कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी मराठी नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी छोट्या पडद्याच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.‘अंतरिक्ष’ नावाच्या विज्ञान विषयक मालिकेमधून त्यांनी टीव्ही विश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘युगपुरुष’ या गाजलेल्या मालिकेत देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या मालिकेनंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यामालिकेनंतर त्यांच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. यानंतर त्यांची पावलं मोठ्या पडद्याच्या दिशेनी वळली.
‘शाबास सुनबाई’, ‘वजीर’, ‘अशीही बनवाबनवी’ अशा चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. ‘अशीही बनवा बनवी’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला कलाटणी दिली. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे बॉलिवूड चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. अखेर त्यांनी ‘हिना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली.
‘हिना’ हा चित्रपट त्याकाळी सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील ‘देर ना हो जाए कही देर ना हो जाए’ हे गाणे अश्विनी भावे यांच्यावर चित्रित केले गेले होते, जे आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी लग्न करून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजही त्या अनेक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात.