मराठी भावगीतांचा अरुणोदय : अरुण दाते

टीम AM : मराठी संगीताने अनेकविध गीतप्रकार आपल्या अंगाखांद्यावर खेळवले. त्यातला अतिशय संपन्न प्रकार म्हणजे भावगीत गायन, आणि या भावगीतांच्या समृद्ध दुनियेतील ‘शुक्रतारा’ म्हणजे गायक अरुण दाते. त्यांच्या जन्मदिनी जाणून घेऊया त्यांच्याविषयी.. 

अरुण दाते यांचे वडील रामुभैया दाते म्हणजे इंदूर येथील प्रतिथयश गायक तसेच रसिक. स्वतः पुलंनी रामुभैयांवर लेख लिहावा इतकं संपन्न व्यक्तिमत्व अरुण दाते यांना वडील म्हणून लाभलं. घरात गायनाचे वातावरण होतेच. शिवाय अरुण दाते यांनी सुरुवातीला पंडित कुमार गंधर्व आणि नंतर के महावीर यांच्याकडे गायकीचे शिक्षण घेतले. 1955 पासून अरुण दाते आकाशवाणीवर गाऊ लागले. त्यांच्या कारकीर्दीला नव्या नावासह मिळालेल्या वळणाचा किस्सा गमतीशीर आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी अरुणजींना मराठी गीत गायनाबद्दल विचारले तेव्हा सुरवातीला चक्क त्यांनी नकार दिला. इंदूरमध्ये वाढल्याने आपले मराठी फारसे चांगले नाही, असा न्यूनगंड त्यांना होता. पण वडीलांनी आग्रह केल्याने ते गीत अरुणजी गायले. आकाशवाणीवरील ‘भावसरगम’ कार्यक्रमासाठी ‘शुक्रतारा’ ध्वनिमुद्रीत झाले, गीतप्रसारणावेळी गायकाचे नाव सांगितले जाते. अरुणजीचे खरे नाव अरविंद पण घरी सगळे त्यांना ‘अरु’ नावाने संबोधत. त्यामुळे अरुण नाव असावे असा खळेजींचा गैरसमज झाला. त्यांनी गायकाचे नाव अरुण असे कळवले. आणि अरविंद दाते यांचे अरुण दाते नामकरण झाले ते कायमचे.

‘शुक्रतारा’ या गाण्याने अरुणजींना प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘शुक्रतारा’ याच नावाने अरुणजींनी भावगीत गायनाचे अडीज हजारांहून अधिक कार्यक्रम केले. अरुण दाते, मंगेश पाडगावकर, यशवंत देव या त्रयीने महाराष्ट्राला भावगीतांचा सदाबहार खजिना दिला. मराठी संगीताला आशयघन भावगीतांकडे पुन्हा वळवण्याचे श्रेय दाते यांना निःसंशय जाते.

बीबीसी लंडनमधील स्टुडीयोत आतापर्यंत फक्त दोन मराठी गाणी गायली गेली आहेत. ही गीतं म्हणजे शुक्रतारा आणि भातुकलीच्या खेळामधली… अरुणजी ब्रिटनमध्ये शुक्रताराचे कार्यक्रम करत होते. त्याकाळी विमानप्रवास आजच्या इतका सोपा आणि परवडणारा नव्हता. त्यामुळे तबल्यावर अरुणजीचे काका शामुभैया दाले, सूत्रसंचालक सुप्रसिद्ध लेखक व. पु. काळे आणि अरुणजी स्वतः असे तिघेच कार्यक्रम करत हार्मोनिअमवाल्याचा खर्च वाचावा म्हणून व. पु. स्वतः हार्मोनियम शिकले होते, ते साथ करत. केवळ या दोघांच्या जोडीने ब्रिटनमधील मैफिलीत अरुणजी हजारों श्रोत्यांना कसे मंत्रमुग्ध करतात हे बीबीसीच्या वार्ताहरांनी पाहिल्यावर अरुणजींना बीबीसी स्टुडीयोत आमंत्रित करून त्यांचे ध्वनीमुद्रण झाले.

अरुणजींची सगळीच भावगीतं म्हणजे मास्टरपीस आहेत. या जन्मावर या जगण्यावर, शुक्रतारा, जेव्हा तिची नी माझी, भातुकलीच्या खेळामधली, स्वरगंगेच्या काठावरती, दिवस तुझे हे फुलायचे, मान वेळावुनी धुंद जपून चाल पोरी जपून चाल, डोळे कशासाठी, काही बोलायाचे आहे, डोळ्यात सांजवेळी, सखी शेजारणी, धुके दाटलेले उदास उदास, भेट तुझी माझी स्मरते, सूर मागू तुला मी कसा, लतादीदींबरोबरचं संधीकाली या अशा ही आणि इतर सगळीच गाणी लोकप्रिय आहेत.

मराठी संगीत कितीही बदललं तरी अरुण दाते यांची भावगीत मात्र सदैव नवनव्या पिढ्यांना आपलंसं करत राहतील इतका गोडवा त्या गीतांमध्ये नक्की आहे. शब्दांमधील काव्य त्याच्या अर्थासह नजाकतीने पोहोचवणारे गायक म्हणून अरुण दाते कायम स्मरणात राहतील.